कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील दहीवली-निमगाव (टे.) च्या शिव हद्दीवर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अत्याधुनिक माती, पाणी व देठ परीक्षणासाठी एक प्रयोगशाळा सुरू होणार आहे. ती ग्रामीण भागातील पहिलीच प्रयोगशाळा ठरणार आहे.
हा प्रकल्प माढा वेल्फेअर फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतला आहे. याचा भविष्यात माढा, करमाळा, पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. भूमिपूजनाचा शुभारंभ हा मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या प्रयोगशाळेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे दोन कोटी खर्च होणार आहे. त्यापैकी १.२० कोटी रुपये मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून सीएसआर निधी म्हणून माढा वेल्फेअरकडे उपलब्ध करून दिला आहे.
यात उल्लेखनीय बाब म्हणजे माढा वेल्फेअर फाउंडेशनचा पूर्वीचा प्रकल्प बेंद ओढा खोलीकरण, रुंदीकरण यासाठीही मुकुल माधव फाउंडेशनने ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या खोलीकरण, रुंदीकरण प्रकल्पामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा झालेला असून, गेल्या वर्षीच्या पूरपरिस्थितीमध्ये पूर नियंत्रणासाठीही त्या ओढ्याच्या खोलीकरणाच्या कामाचा थेट परिणाम तेथील शेतकरी आणि नागरिक यांना जाणवला आहे.
माढा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी येथील पीक पद्धती आणि पीक उत्पादन वाढीच्या पद्धती यासाठी आवश्यक बाबींमध्ये प्रयोगशाळेचा विशेष उल्लेख माढा वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी करून विविध सीएसआर फंडिंग हाउसेस यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करूनच खताच्या मात्रा दिल्यास खर्चिक पीक उत्पादन पद्धतीला फाटा देणे सहज शक्य आहे. या मागणीला अनुसरून फाउंडेशनचे सीएसआर एक्झिक्युटिव्ह महेश डोके आणि तांत्रिक प्रमुख युवराज शिंदे यांनी हा प्रकल्प अहवाल बनविला होता.
----
फोटो- धनराज शिंदे व रितू छाब्रिया
040921\354920210613_144544.jpg~040921\3549img-20210903-wa0283.jpg
धनराज शिंदे फोटो~रितू छाब्रिया फोटो