प्रकाश पाटील - कोपार्डे --अवकाळी पाऊस, गुळाला मिळणारा दर, गुऱ्हाळासाठी द्यावा लागणारा खर्च व ऊस उत्पादनाचा खर्च यांचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्याला गूळ उत्पादनातून प्रतिटन ८०० ते १००० रुपयांचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मागली वर्षीपेक्षा या हंगामात आजअखेर अडीच लाख गूळ रव्यांची ८३० किलोप्रमाणे एक रवा कमी आवक झाली आहे. यावर्षी गुळाचा हंगाम आॅक्टोबरपासून सुरू झाला आहे. शुभारंभाचा सौदा साधारण ५५५५ ते ६६६६ असा माफक काढल्यानंतर गुळाच्या दराला ग्रहण लागले असून उत्पादन खर्च काय, पण एक क्विंटल गूळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या उसाचे साखर कारखाने देत असलेल्या दराचा विचार केल्यास ८०० ते १००० रुपये तोटाच सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. यातून गूळ उत्पादक असोसिएशनने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हमीभावासाठी जिल्ह्यातील गुऱ्हाळ बंद आंदोलन १७ ते २२ डिसेंबरअखेर केल्याने एक किलो गुळाची आवकही बाजार समितीत झाली नाही. यानंतर गुळाच्या दरात थोडीशी वाढ झाली असून गुळाला मिळणारा २६०० ते २७०० दर आज ३०५० ते ३००० प्रति क्विंटलवर पोहोचला आहे.मात्र, या दरम्यान गुऱ्हाळघर मालकांनी गुऱ्हाळे बंद ठेवल्याने गावी गेलेले मजूर परत आणण्यास मोठी कसरत करावी लागत आहे, तर साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना एफआरपी २४०० ते २६०० प्रतिटन मिळत असल्याने गूळ उत्पादनांकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील ६०० गुऱ्हाळघरांना कुलपे लागली आहेत.बाजार समितीत दैनंदिन गूळ रव्यांची (३० किलोप्रमाणे) आवकही १५ ते १६ हजारांवर आली असून आजअखेर ७ लाख ४१ हजार १०६ गूळ रव्यांची आवक झाली आहे. मागीलवर्षी हीच आवक ९ लाख ८९ हजार ६७० होती. मागील वर्षीपेक्षा तब्बल अडीच लाख गूळ रव्यांची आवक कमी झाली आहे. यावरून गूळ उत्पादनाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले असून जर अशीच गुळाच्या दराबाबत अनास्था राहिल्यास जगप्रसिद्ध कोल्हापुरी गूळ उत्पादन ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया गुऱ्हाळघर मालक व गूळ उत्पादकांकडून व्यक्त होत आहेत.शासनाने कोल्हापूरचा गूळ उद्योग वाचवायचा असेल तर प्रथम गुळाला हमीभाव द्यावा. गुळाचे दर पडल्यास शासनाने गूळ खरेदी व्यवस्था करावी. त्याचबरोबर अडतचे शेतकऱ्यांच्या गळ्यातील घोंगडे कायमचे काढून शासनाने गूळ उत्पादकांना मदत करावी. - शिवाजी पाटील, अध्यक्ष, गूळ उत्पादक असोसिएशन कोल्हापूर जिल्हा.गुळाचे दर पडल्याने हा व्यवसाय व शेतकरी अडचणीत आले आहेत. दर पडल्याने हे कृत्रिम संकट गूळ उत्पादकांवर आले आहे. शासनाने लक्ष घातल्यासच गूळ उत्पादन टिकणार आहे.- शिवाजी तोडकर, गुऱ्हाळघर मालक, गूळ उत्पादक, वाकरेपणन संचालक सुभाष माने यांनी अडत खरेदीदारांकडून वसूल करण्याच्या निर्णयावर शासनाने व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडत स्थगिती दिली आहे. सध्या गुळाला जरी ३१०० रुपये दर मिळत असला तरी १ रु. ३० पैसे शेकडा अडत जात असल्याने ३००० रुपयेच शेतकऱ्यांच्या हातात पडत आहेत. कोल्हापुरी गूळ वाचविण्यासाठी कोल्हापूरचेच सहकारमंत्री असणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांनी अडतचा पणन संचालकांचा निर्णय कायम ठेवून दिलासा द्यावा, अशा प्रतिक्रिया गूळ उत्पादकांकडून व्यक्त होत आहेत.गूळ उत्पादनापेक्षा कारखाना बराएक क्विंटल गूळ उत्पादनासाठी एक ते दीड टन ऊस गाळप करावा लागतो. गुळाला सध्या ३१०० रुपये क्विंटल दर आहे. त्यात आणखी प्रक्रिया खर्च किमान एक हजार येतो.एक टन उसाला साखर कारखाने देत असलेला २५०० रुपये प्रतिक्विंटल दर आणि यात गूळ प्रक्रिया एक हजार दर असा एकूण ३५०० रुपये एक क्विंटल गुळासाठी खर्च जातो आणि मिळतात क्विंटलला ३१०० रुपये म्हणजे पुन्हा ४०० रुपये तोटाच. त्यापेक्षा साखर कारखानेच बरे, असा मतप्रवाह ऊस उत्पादकांत निर्माण झाला असून यावर्षी साखर कारखान्यांना गुळाचे दर पडल्याने गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी जादा ऊस उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील सहाशे गुऱ्हाळघरांना कुलपे
By admin | Published: December 29, 2014 9:42 PM