सोलापूर : ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू, राजीनामा तसेच अपात्र या कारणांमुळे रिक्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींमधील १७६ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाली असून, २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून मतदान कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे नोटिफिकेशन बुधवार, १७ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ४१ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक लागली आहे. यासोबत माढा तालुक्यातील १५ ग्रामपंचायती, करमाळा तालुक्यातील १४, मोहोळमधील ९, मंगळवेढामधील १७, बार्शीमधील २४, मारळशिरसमधील १८ पंढरपूरमधील ७, सांगोला ८, उत्तर सोलापूर तालुक्यातील ३ तसेच दक्षिण सोलापूरमधील १६ असे एकूण १४८ ग्रामपंचायतींमधील १७६ सदस्यांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
असा आहे पोटनिवडणूक कार्यक्रम
- अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना : २२ नोव्हेंबर
- निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध : २२ नोव्हेंबर
- उमेदवारी अर्ज वितरण व सादर : ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर स. ११ ते दुपारी ३
- छाननी : ७ डिसेंबर, सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख : ९ डिसेंबर, दुपारी ३ वाजेपर्यंत
- चिन्ह वाटप : ९ डिसेंबर, दुपारी ३ नंतर
- मतदान दिनांक : २१ डिसेंबर, स. ७.३० ते सायं ५.३० पर्यंत
- मतमोजणी : २२ डिसेंबर
- निकाल प्रसिद्ध : २७ डिसेंबर