सोलापूर: कल्याण नगर परिसरातील पूल पार करुन डाव्या बाजूच्या उतारावर असलेले पत्र्याचे शेड.. या शेडमध्येच कथित पीरबाबा दर्ग्यात भरलेला दरबार.. करणी, भानामती काढून देतो म्हणून जमलेला लोकांचा मेळा.. परगावाहून येणाºया लोकांना ‘भोंदूबाबा सांगत होता.. लई मोठी करणी हाय.. काढावं लागंल.. साडेसात हजार रुपये लागत्याल’. अचानक पोलीस आले, एकच धांदल उडाली. काय घडतेय हे समजण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना उचलले अन् थेट पोलीस ठाण्यात हजर केले.
गेल्या काही वर्षांपासून शिवाजी मारुती चव्हाण.. वय वर्षे ६५ यांनी आपणास पीरबाबा प्रसन्न आहे, आपल्या अंगात पीरबाबा येतो. करणी, भानामती काढतो म्हणून पैशासाठी लोकांना फसवत असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी दोन वेळा गिºहाईक म्हणून शहानिशा केली. खात्री पटताच गुरुवारी पुन्हा गेले. जाताना त्यांनी विजापूर नाका पोलिसांची मदत घेतली.
दोनवेळा आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडे गेलेल्या सुधीर कुर्डे यांना भोंदूबाबांनी ओळखले. पैसे आणले का? विचारणा केली. करणी काढून देतो. एक बाई आणि माणसाने तुला करणी केल्याचे सांगितले. या दरम्यान त्यांना मदत करणाºया महिलांनी भोंदूबाबाची री ओढत बाबा कुठली करणी कायमची काढतात. हैदराबादपासून लांबून लोक येतात, अशी पुष्टी जोडली. हे सारं सुरु असतानाच पोलीस आत आले अन् सारं काही आलबेल चालू असताना एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी थेट भोंदूबाबाचा हात धरत चला म्हणाले. जमलेल्या लोकांना काहीच समजेना. ‘वो साह्यब त्यंनी कायबी केलं नाही, म्हणणाºया माणसाला का घेऊन चाललाव. दुसरीकडं किती काय काय चालतंय तिकडं बगा की’. असा गलका केला. पोलिसांनी त्यांचं काही न ऐकता थेट विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेलं अन् महाराष्टÑ जादूटोणा कायदा ३ अन्वये गुन्हा दाखल केला.
या कारवाईच्या वेळी अंनिसचे अध्यक्ष रवींद्र मोकाशी, कुंडलिक मोरे, यशवंत फडतरे, ब्रह्मानंद धडके, शालिनी ओक, मधुरा सलवारु यांच्यासह विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, फौजदार सचिन बनकर, बीट मार्शलचे पोलीस पटेल, जाधव, पोलीस शिवानंद भीमदे, दत्तात्रय काटे, विनोद व्हटकर यांचा सहभाग होता.
असा रचला सापळा- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यशवंत फडतरे आणि कुंडलिक मोरे यांनी भोंदूबाबाकडं जाण्यापूर्वीच विजापूर नाका पोलीस ठाण्यास मदतीची मागणी केली होती. त्यानुसार कल्याण नगर पुलाच्या खाली पोलीस उभे होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास सारे आपापल्या कामात गढलेले असताना पत्रा शेडमध्ये मात्र बुवाबाजीचा पर्दाफाश होत होता. गिºहाईक बनून गेलेल्या इसमाला पैशाची मागणी करताना अंनिसच्या कार्यकर्त्यांनी इशारा करताच पोलीस धावले अन् भोंदूबाबाला अटक करण्यात आली.
अन् नातलगांचा लोंढा पोलिसात- भोंदूबाबांना पोलीस ठाण्यात नेल्याची वार्ता समजताच नातलग मंडळी थेट पोलीस ठाण्यात जमा झाली. साहेब त्यंनी काय बी केलं नाही. त्यांना सोडा. अशी विनवणी करण्यात येत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.