सोलापूर : दुपारी अडीचच्या सुमारास घरी बसलेल्या तरुणाच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने ‘बजाज डीबीएस कंपनीतून बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्डची मुदत संपत आल्याचे सांगून ओटीपी मागवून घेतला, त्याद्वारे १ लाख १५ हजार रुपये ऑनलाईन काढून घेऊन गंडा घातला. गुरुवारी दुपारी अत्तार नगर, विजापूर रोड येथून हा प्रकार घडला. तानाजी लक्ष्मण व्हनमाने (वय- ४०) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे. यातील फिर्यादीत म्हटले आहे की, अत्तार नगर येथे राहणारे तानाजी व्हनमाने दुपारची वेळ असल्याने घरी बसलेले होते.
अडीचच्या सुमारास त्यांच्या ९०९६८०९३३१ या मोबाईलवर अनोळखी मोबाईधारकाचा फोन आला, त्याने आपण बजाज डीबीएस कंपनीतून बोलत असल्याचे सांगत ‘तुमच्या क्रेडिट कार्डची मुदत संपत आली आहे ते लवकर रिन्युव्ह करुन घ्या असे सांगताना फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांच्या मोबाईलवर तीन टेक्स मेसेज पाठवले व त्यावर आलेले ओटीपी मेसेज मागवून घेतले. यानंतर संबंधीत मोबाईलधारकाने फिर्यादीच्या डीबीएस सुपर कार्ड विसा या क्रेडिट कार्ड क्र. ४१८२६९०१७७४९९३०४ मधून चार वेळा १ लाख १५ हजार रुपये काढून घेऊन ऑनलाईन फसवणूक केली. पैसे काढल्याचा त्यांना मेसेज आल्याने त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.