दक्षिण सोलापूर : रिकाम्या कॅरेटच्या खाली दडवून आणलेला विमल कंपनीचा गुटखा मंद्रूप पोलिसांनी जप्त केला. हा गुटखा कर्नाटकातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात होता.
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील पोलीस बंदोबस्त नुकताच हटवण्यात आला आहे. या संधीचा फायदा उठवत कर्नाटकातील गुटखा बहाद्दरांनी विमल कंपनीचा गुटखा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणत असल्याचा सुगावा मंद्रूपच्या पोलिसांना लागला. स्थानिक खबऱ्याने पोलिसांना याबाबतची पक्की खबर दिली होती. मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी सापळा रचून गुटख्याचे वाहन ताब्यात घेतले.
कर्नाटकातून महाराष्ट्रात येताना पिवळ्या रंगाच्या ॲपे रिक्षा वरच्या बाजूला रिकामे प्लास्टिक कॅरेट टाकण्यात आले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी कॅरेट बाजूला काढले असता गुटख्याचा साठा दिसून आला. एक लाख रुपये किमतीचा गुटखा आणि ॲपेरिक्षासह १ लाख ९१ हजार रुपयाचा मुद्देमाल मंद्रूप पोलिसांनी जप्त केला. रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याकामी मंद्रूपचे सपोनि गणेश पिंगूवाले यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
----