मोहोळ : सीना नदीच्या पात्रामधून मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी परिसरामध्ये बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विशेष पथकाने धाड टाकत एक लाख पाच हजार रुपयांची वाळू, ऐंशी हजारांच्या कप्पीसह ३० लाखांचे वाहन असा एकूण ३१ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मंगळवारी पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यात सीना नदीकाठी पासलेवाडी परिसरामध्ये क्रेनच्या माध्यमातून वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली होती. १ डिसेंबर रोजी रात्री विशेष पथकाने पासलेवाडी परिसरात सीना नदीकाठी धाड टाकली. या धाडीत एम. एच. १२, आर. ८०१२, एम. डब्लू. एफ. ४६१४, एम. एच. १२, ए.आर. ५६७३ हे तीन ट्रक आणि एम. एच. १३, ए. ६०२३ क्रमांकाचा ट्रॅक्टर अशी चार वाहने पकडली. या कारवाईत चार वाहनांमधून पंधरा ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
याप्रकरणी रणजित सिद्धेश्वर कोळी (वय १९, रा.नरखेड), अप्पा श्रीरंग मोरे (वय ४५, रा. नजीकपिंपरी), मल्हारी बजरंग आडके (वय ३३,रा. पानगाव ता. बार्शी), अच्युत गायकवाड (रा. गायकवाड वस्ती.मोहोळ), जयराम सुरवसे (रा. दडशिंगे, ता. बार्शी), तानाजी बोबडे (रा. पासलेवाडी, ता. मोहोळ), सुधीर काकडे (रा. अनगर, ता. मोहोळ) या सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी विशेष पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रणजित मदने यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल सचिन मुसळे हे करीत आहेत.
---
फोटो :