रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील सांगोला आगार हे महत्त्वपूर्ण असे एसटीचे आगार आहे. सांगोला आगारात १३० चालक, १३२ वाहक तसेच प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी असे ३५० कर्मचारी कर्तव्यावर आहेत. आगारात एकूण बसेसची संख्या ५८ असून, त्यापैकी १५ बसेस मुंबईला पाठविल्या आहेत, तर सांगोला आगारातून दररोज १४२ फेऱ्यांच्या माध्यमातून १५ हजार किमी एसटी धावत आहे. यामध्ये ग्रामीण भागासह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या कमी प्रमाणात होत असल्याने आगाराच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना पूर्वी काळात सांगोला आगाराला दररोज २५० फेऱ्यांच्या माध्यमातून सुमारे सहा लाखांचे उत्पन्न मिळत होते. आता ते तीन लाखांनी कमी झाले आहे. सध्या १४२ फेऱ्यांच्या माध्यमातून १५ हजार किमी प्रवासी वाहतूक केली जात असून, दररोज इंधनापुरते केवळ तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. जवळपास ७० टक्के बसफेऱ्या नियमित झाल्या आहेत. सर्व शाळा सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्यात येतील असे आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी सांगितले.
----