कोरोना महामारीमुळे ५ एप्रिल ते ६ जूनपर्यंत तब्बल २ महिने लाॅकडाऊनमध्ये प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एसटीची सेवा बंद ठेवली होती. यामुळे सांगोला आगारातील ५० बस जाग्यावर थांबून होत्या. तब्बल दोन महिने लालपरीची चाके जागेवर रुतल्याने सांगोला आगाराचे सुमारे अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान, कधी एकदा लाॅकडाऊन संपून पुन्हा एसटी पूर्वपदावर येईल, या आशेने चालक, वाहक, कर्मचाऱ्यांचे डोळे प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले होते.
दोन महिन्यांनंतर कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ लागल्यामुळे सरकारने अनलॉकची नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार सोशल डिस्टन्स व तोंडाला मास्क लावून एसटी प्रवासी बस वाहतुकीला हिरवा कंदील मिळाला. तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारी सांगोला आगारातून सोलापूर, अकलूज, पंढरपूर या मार्गावर ९०० कि.मी. एसटीची चाके धावली. दिवसभर ७ फेऱ्यांतून १४० प्रवाशांनी चढउतार केली. त्यामधून एसटीला १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मंगळवारपासून सांगोला आगारातून पुणे, सोलापूर, अकलूज मार्गावर बस सोडल्या जाणार आहेत, तर प्रवासी प्रतिसादानुसार सांगोला आगारातून आटपाडी, जत, मंगळवेढा, आदी मार्गावर बस सोडल्या जाणार असल्याचे आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी सांगितले.