सोलापूर : विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू झाला, त्यातून आलेले नैराश्य आणि मदत देण्याबाबत महावितरण आणि शासकीय यंत्रणेने दाखवलेल्या अनास्थेमुळे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाºया त्या शेतकºयाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेताना गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
सुलतानपूर (ता. अक्कलकोट) येथील लक्ष्मण आनंद यादव (वय ३४) या शेतकºयाच्या बैलाचा विजेच्या धक्क्याने ९ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. बैलाच्या मृत्यूमुळे लक्ष्मणच्या रोजी-रोटीचा आधार गेला.
बैलाची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी लक्ष्मणने महावितरणकडे चकरा मारल्या. जिल्हाधिकाºयांकडे आपले गाºहाणे मांडले. शासनाच्या निधीतून मदत मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
महावितरणने त्याची दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेकडे मदत देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती त्याला मिळाली. या प्रकाराने तो निराश झाला. अवघ्या दीड एकरात पोट भरणे केवळ अशक्य होते. पाठीमागे पत्नी, अंध-दिव्यांग आई आणि दोन मुलांचा खर्च त्याला भागवता येत नव्हता.
लक्ष्मणचे वडील आनंद यादव यांनी कर्जबाजारीपणामुळे दोन वर्षांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. लक्ष्मणला जगण्याचा मार्ग सापडत नसल्याने त्याने आपल्या वडिलांनी निवडलेल्या मार्गावर चालणे पसंत केले. २८ नोव्हेंबर रोजी त्याने आपली कैफियतची मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग केली.
बैलाच्या मृत्यूमुळे माझे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणकडून किंवा शासनाकडून मला नुकसानभरपाई मिळेल, असे वाटत होते. परंतु दोन-तीन महिने हेलपाटे मारूनही मला काहीच मिळाले नाही. यापुढेही मला सरकारी मदत मिळण्याची खात्री वाटत नाही. त्यामुळे मी विषारी औषध घेऊन स्वत:ला संपवत आहे, अशा प्रकारची व्हिडीओ क्लिप तयार करून लक्ष्मण यादवने ती व्हायरल केली.विषप्राशन केल्यानंतर तो बेशुद्धावस्थेत गेला. अखेर त्याला एक डिसेंबर रोजी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘हराळी’ नामक गवतावर मारले जाणारे विषारी द्रव प्राशन केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू झाले; मात्र दिवसेंदिवस त्याची प्रकृती चिंताजनक होत राहिली.
फुप्फुस निकामी झाल्याने तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. अखेर बुधवारी सकाळी त्याला विशेष रुग्णवाहिकेतून पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता त्याने मृत्यूशी सुरू केलेली झुंज संपली.
लक्ष्मण यादव या सुलतानपूरच्या शेतकºयाचा बैलाच्या नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव आला. परंतु या प्रस्तावासोबत बैलाचा पोस्टमार्टेम रिपोर्ट, पंचनामा, बैलाचे मूल्यांकन, शेतकºयाचा अर्ज आदी कागदपत्रे नव्हती. ती पुरवण्यासाठी वारंवार त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. परंतु अद्यापपर्यंत ती उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे बैलाच्या नुकसानभरपाई देता आली नाही़- संजय म्हेत्रे, उपअभियंता,महावितरण, अक्कलकोट विभाग
लक्ष्मण यादव यांच्या बैलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना शासकीय मदत देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. निधी उपलब्ध होताच मदत देण्याचा प्रयत्न करू.- अंजली मरोड, तहसीलदार, अक्कलकोट