पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असला तरी, प्रशासनाकडून वाखरी-पंढरपूर मार्गावरील जीवघेणे खड्डे बुजविले जात नव्हते. याबाबत गुरुवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दाखल घेत, हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे वारकरी भाविक, वाहनधारकांची सोय होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीही आषाढी यात्रा सोहळा मानाच्या १० पालख्या व मोजक्याच भाविकांसह साजरा होत आहे. या पालख्या बसने वाखरी पालखी तळावर आणण्यात येणार आहेत. मात्र पालखीप्रमुख व वारकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने वाखरी-पंढरपूर मार्गावर ५ कि.मी. अंतर पायी चालण्यास परवानगी दिली आहे. म्हणून या पालख्या आपल्या सर्व परंपरा, रितिरिवाज जपत या मार्गावर पायी चालणार आहेत. मात्र या दुहेरी मार्गावर दोन्ही बाजूंनी ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले होते. त्यामुळे बसने येणाऱ्या वारकऱ्यांचीही वाट बिकट बनली होती.
यात्रा नियोजन बैठकीत या मार्गावरून पालख्या चालत येणार आहेत हे गृहित धरून खड्डे बुजविण्याच्या लेखी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रांताधिकारी सचिन ढोले, नगरपालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र यात्रा सोहळा चार दिवसांवर येऊन ठेपला तरी, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. याबाबत १५ जुलै रोजी खड्ड्यांच्या छायाचित्रांसह ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तातडीने खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे.