पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी रविवारी सकाळी पंढरपूर तहसीलच्या शासकीय गोडावूनमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. अवघ्या हजार-पाचशेच्या मतांनी आघाडी कमीजास्त होत असल्याने आणखीनच सस्पेन्स वाढत होता. मात्र दुपारदरम्यान पंढरपूर तालुका, मंगळवेढा शहराची मतमोजणी झाल्यानंतर आवताडे जवळपास सहा हजार मतांनी आघाडीवर होते. तेव्हाच त्यांना विजयाचा अंदाज आला आणि ते पंढरपुरातील परिचारकांच्या वाड्यावर जाऊन पोहोचले.
त्यानंतर परिचारक बंधूंशी झालेल्या चर्चेनंतर उमेश परिचारक यांना सोबत घेऊन ते मतमोजणी केंद्रात पोहोचले ते विजयी प्रमाणपत्र घेऊनच परतले. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर स्व. भारत भालकेंना कायम मताधिक्य देणारे वाखरी, गादेगाव, कौठाळी, शिरढोण, कोर्टी, बोहाळी, कासेगाव आदी गावांमध्ये काही ठिकाणी भालके मायनस गेले तर काही ठिकाणची आघाडी थोडक्या मतांवर आल्याने मतमोजणी केंद्रात असलेले भालके समर्थक कार्यकर्ते अस्वस्थ होते. त्यानंतर पंढरपूर शहराची मतमाेजणी सुरू झाली. पंढरपूर शहरातही नगरपालिका ताब्यात नसताना कायम स्व. भारत भालकेंना अनेक प्रभागांमध्ये भरभरून मते मिळाली होती. यावेळी मात्र पंढरपूर शहरात परिचारक-आवताडेंच्या एकीचा करिश्मा चालल्याचे चित्र होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे भगीरथ भालके यांना मताधिक्य मिळाले नाही.
मागील विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहर व २२ गावांमध्ये स्व. भारत भालके सहा हजाराचे मताधिक्य घेऊन मंगळवेढ्यात दाखल झाले होते. मात्र यावेळी चित्र वेगळे होते. मागील मताधिक्य कमी करून उलट जवळपास ९०३ मतांचे मताधिक्य घेऊन समाधान आवताडे आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह परिचारकांच्या भेटीला पंढरपुरात दाखल झाले.
मतमोजणी केंद्रात महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचे चुलत बंधू व्यंकट भालके मतमोजणी केंद्रात निवडक कार्यकर्त्यांना घेऊन ठाण मांडून होते. मात्र दुपारी दोनच्या दरम्यान मताधिक्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनीही मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. मात्र शेवटपर्यंत भगीरथ भालके यांचे काही कार्यकर्ते पोस्टल मते व शेवटच्या फेरीतील मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर तळ ठोकून बसले होते. काही दगाफटका होऊ नये असे म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जिद्द न सोडता त्याठिकाणी उपस्थित होते.
--------
पंढरपुरात फटाक्यांची आतषबाजी
पंढरपुरात कोरोनामुळे अगोदरच लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र मतमोजणीदिवशी काही उत्साही कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूला येऊ शकतात. यासाठी पोलीस प्रशासनाने नव्याने नियमावली लावत चोख बंदोबस्त ठेवला होता. दिवसभर त्यांना हे वातावरण शांत ठेवण्यात यश आले होते. मात्र सायंकाळी ५ च्या दरम्यान अधिकृतपणे समाधान आवताडे विजयी झाल्याची घोषणा झाल्याने पंढरपूरच्या गल्लीबोळात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.
------
अन परिचारकांचा वाडा पुन्हा गजबजला..
२००९ साली राष्ट्रवादीत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी स्वत:ची जागा सोडणाऱ्या परिचारकांच्या वाड्यावर कार्यकर्त्यांची कायम गर्दी असायची. त्यानंतर २०१४, २०१९ ला परिचारक विरोधी भारत भालके आमदार म्हणून राहिले. आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने परिचारकांनी दोन पावले मागे घेत समाधान आवताडेंना जाहीर पाठिंबा दिला. केवळ पाठिंबाच नाही तर त्यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. समाधान आवताडे विजयी झाले आणि परिचारकांच्या वाड्यावर पंढरपूर-मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे गेल्या साडेअकरा वर्षानंतर परिचारकांचा वाडा आमदारकीच्या निमित्ताने पुन्हा गजबजल्याचे चित्र होते.