समीर इनामदार सोलापूर : स्वातंत्र्यापूर्वी १९३४ साली खरेदी केलेली जागा १९३६ साली इंग्रज सरकारने ताब्यात घेतल्यानंतर या हुकूमनाम्याविरोधात गेल्या साठ वर्षांपासून मूळ मालकाची वारसदार वृद्धा झगडतेय. आताच्या इकबाल मैदानाची जागा ताब्यात मिळावी म्हणून शेकडो कागदपत्रे घेऊन सरकार दरबारी संघर्ष करताना ताहेरा म. कासीम रायचूरकर थकल्या. या शासनाला कधी जागा येणार? असा आर्त सवाल त्यांनी केलाय.
५ फेब्रुवारी १९३४ साली सरकारातून अल्लाउद्दीन इमामसो यांनी तेलंगी पाच्छापेठ, जेलरोड येथील सिटी सर्व्हे नंबर १०३७२/४ पैकी प्लॉट नं. ५९ ही ४ एकर २२ गुंठे जागा ७४२ रुपये ४ आणे ३ आणे किमतीस खरेदी केली. त्यानंतर त्यांच्याकडून २२ मे १९३४ साली एक हजार रुपये किमतीस खताळसो करीमसो रायचूरकर यांनी खरेदी केली. ही जागा २६ नोव्हेंबर १९३६ साली इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी ही जागा २ डिसेंबर १९४२ साली सरकारी सुपरिंटेंडेंट क्रिमिनल ट्राईब सेटलमेंटच्या नावे केली. इथूनच जागेबाबत संघर्ष सुरू झाला.
३ जानेवारी १९८१ साली नगररचना विभागाने ते क्षेत्र दुरुस्त केले. १४ आॅगस्ट ८६ साली पोलीस अधीक्षक कार्यालयास ही जागा देण्यात आली. २६ जून १९९६ साली पोलीस अधीक्षकांचे नाव कमी करण्यात आले. २८ सप्टेंबर २००० साली या जागेवर सोलापूर महापालिकेचे नाव नोंदविण्यात आले. ३० एप्रिल २०१२ रोजी यावर महाराष्टÑ शासनाचे नाव नोंदविण्यात आले. २० एप्रिल २०१५ साली क्रीडांगणासाठी आरक्षित केलेली ही जागा शर्तभंग झाल्याने नोंदीतील क्षेत्र कमी करून महाराष्टÑ शासन या नावाची नोंद करण्यात आली. यातील जागामालक खताळसो करीमसो रायचूरकर यांचे ११ डिसेंबर ५७ साली निधन झाले. त्यांच्या नात ताहेरा म. कासीम रायचूरकर यांनी मूळ जागा आपल्या ताब्यात मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केला.
आमची जागा असताना जिल्हाधिकाºयांनी स्वत:च्या ताब्यात घेतली कशी, असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. याची मिळकत पत्रिका उपलब्ध होत नसल्याचे प्रशासनाने माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तर देताना म्हटले आहे. ताहेरा रायचूरकर यांनी जिल्हाधिकारी, महापालिका, नगर भूमापन विभागाकडे अर्ज करून आपले आजोबा जिवंत असताना त्यांच्या नावे असणारी जागा कशी काय हडप झाली, याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन विचारणा केली आहे.
नगर भूमापन कार्यालयाने आपल्यामुळे आदेशाच्या मूळ प्रतीची स्वयंसूची धारिकेत उपलब्ध नसल्याने माहिती देता येत नसल्याचे म्हटले आहे. कोणत्या दस्तामुळे खताळसो करीमसो यांचे नाव कमी झाले, याचा आदेश अभिलेखात सापडत नसल्याचे म्हटले. मूळ मालक पाकिस्तानला गेल्याचे काहींनी सांगितले आहे. मात्र कोणीही पाकिस्तानला गेले नाही.
मूळ मालकाचे ५७ साली सोलापुरातच निधन झाले. त्यामुळे ही चुकीची माहिती देण्यात येत आहे. आपण त्यांच्या वारसदार असून, आपल्याला ही जागा देण्यात यावी, अशी विनंती ताहेरा रायचूरकर यांनी केली आहे. गेली साठ वर्षे आपण या चुकीच्या विरोधात लढतो आहोत. आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा ताहेरांनी विचारली आहे. १९९६ साली आडम मास्तर यांनी विधानसभेत प्रश्न विचारल्यानंतर मनपाच्या ताब्यात ही जागा आल्यानंतर त्यावर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले.
बिल अद्यापही खताळसो यांच्या नावे- या जागेचे वीज बिल अद्यापही खताळसो करीमसो यांच्या नावानेच येते आहे. खताळसो यांचे निधन झाल्यानंतरही अद्यापपर्यंत त्यांच्या नावाने वीज बिल येते. याचाच अर्थ ही जागा अजूनही त्यांच्याच नावे असल्याचे ताहेरा रायचूरकर यांचे म्हणणे आहे.खरेदीपत्रही उपलब्ध- ही जागा १९३४ साली अल्लाउद्दीन इमामसो यांच्याकडून खताळसो म. करीमसो रायचूरकर यांनी खरेदी केली होती. त्याचे खरेदीपत्रही ताहेरा यांनी दाखविले. या जागेसंदर्भातील सर्व मूळ पत्रे आपल्या बाजूने असतानाही आपल्याला न्याय का मिळत नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.