उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले, बीबीदारफळ वडाळा, पडसाळी, बीबीदारफळ या गावांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत होते, तर काहींचा मृत्यूही झाला होता. मात्र, या गावांच्या मध्यभागी असलेल्या रानमसले गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणाऱ्या रानमसले गावाच्या शेतकऱ्यांचा बाजारपेठेशी संबंध. मात्र, मागील वर्षी गावकऱ्यांनी कोरोनाला शिवेबाहेरच अडविले.
यावर्षी मात्र चित्र उलटे झाले आहे. गावात पहिला रुग्ण २ मार्च २१ रोजी आढळला. त्यानंतर १९ मेपर्यंत गावात ९५ व्यक्ती बाधित झाल्या, तर गावकऱ्यांच्या मते कोरोनाबाधित झालेल्या १४ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. २० एप्रिल ते २० मे या एक महिन्याच्या कालावधीत गावात एकूण ३६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात ०३ मृत्यू झाले आहेत.
----
एकापाठोपाठ निधन
गुरुवारी सिंधूबाई गरड यांचा मृत्यू झाला, तर शुक्रवारी त्यांचा मुलगा राजाभाऊ गरड यांचा मृत्यू झाला. अर्जुन गरड यांचे ३ मे रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा शहाजी गरड यांचे, तर गेल्या आठवड्यात शहाजी यांच्या २८ वर्षीय वहिनींचे निधन झाले आहे.
----
चौकट
३ हजार ७७७ लोकसंख्या असलेल्या रानमसले गावात २० एप्रिलपासून दोन दिवस सोडले, तर दररोजच लोक मयत होत आहेत. गावकऱ्यांच्या मते कोरोनामुळे १४ व्यक्तींचा मृत्यू झाला. मात्र, आरोग्य विभागाकडे ७ व्यक्तींची नोंद आहे. ४५ पेक्षा कमी वय असलेल्या चार व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
----
चौकट
बीबीदारफळमध्ये २४ मृत्यू
बीबीदारफळमध्ये कोरोनामुळे २४ व्यक्तींनी जीव गमावला असून धास्ती, हृदयविकार, आजार व वृद्धापकाळाने २६, अशा ५० व्यक्तींचा दीड महिन्यात मृत्यू झाला आहे.
----