सोलापूर : नंदीध्वज आडवे न करता भाविकांकडून पूजा स्वीकारायचे अन् अक्षता सोहळ्यासह सर्वच विधी वेळेत आटोपण्याच्या गेल्या वर्षी मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी घेतलेल्या निर्णयाची यंदाही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुपारी दीडच्या आतच अक्षता सोहळा संपविण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची प्रचिती यंदाही भाविकांना आल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही राजशेखर हिरेहब्बू यांनी मंगळवारी दुपारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घरोघरी नंदीध्वज पूजन अन् नंदीध्वज सरावामुळे सोलापूरकरांना ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे वेध आतापासूनच लागले आहेत.
२ डिसेंबर २०१८ रोजी श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यात बोलावण्यात आलेल्या बैठकीत अनेक धाडसी निर्णय घेताना राजशेखर हिरेहब्बू यांनी ‘लाखो भाविकांचा विचार करा. भावनेवर आवर घाला’ अशी विनंती करताना ‘मला समजावून घ्या’ अशी भावनिक साद घातली होती. त्यावेळी उपस्थित मानाच्या सातही नंदीध्वजांचे मानकरी, मास्तर, नंदीध्वजधाºयांसह भक्तगणांनी टाळ्याच्या गजरात त्यांच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले होते. राजशेखर हिरेहब्बू यांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळेच गेल्या वर्षी अक्षता सोहळा अगदी वेळेत पार पडला होता.
लख..लख यात्रा- प्रकाशमय यात्रा- २ डिसेंबर २०१८ रोजी हिरेहब्बू यांच्या वाड्यात झालेल्या बैठकीत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी भक्तगणांनी आपल्या घरांवर, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन केले होते. ‘लोकमत’ने नंदीध्वज मार्गांवर झळाळी ही संकल्पना मांडली. ही संकल्पना वीरशैव व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले यांनी उचलली. त्यांच्या टीमने ही संकल्पना तडीस नेली अन् गेल्या वर्षी तमाम श्री सिद्धरामेश्वर भक्तांना ‘लख-लख यात्रा- प्रकाशमय यात्रा’ची प्रचिती आली. यंदा नंदीध्वज मार्गावरच झळाळी नव्हे तर संपूर्ण शहर आणि परिसर यात्रेच्या निमित्ताने उजळून निघणार आहे. यंदाची प्रकाशमय यात्रा यशस्वी करण्यासाठी वीरशैव व्हिजनच्या पाठीशी विविध जाती-धर्मातील सेवाभावी संघटनाही सरसावणार आहेत.
मानकरी शिवानंद हिरेहब्बू यांच्या सल्ल्यानेच यात्रेतील प्रत्येक निर्णय अमलात आणले जायचे. त्यांचा शब्द म्हणजे इतर सदस्यांसाठी प्रमाण असायचा. गेल्या आॅगस्ट महिन्यात त्यांचे निधन झाले. गेल्या वर्षी त्यांच्या उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक निर्णयाची यंदाही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे.-राजशेखर हिरेहब्बू, यात्रेतील प्रमुख मानकरी.