सोलापूर - गानसम्राज्ञी लता मंगेशकर या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या निस्सीम भक्त होत्या. विशेष म्हणजे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसाद सेवेसाठी कार्यरत असलेल्या अन्नछत्र मंडळाच्या कार्यावर त्यांचे विशेष लक्ष होते. त्याचाच एक भाग म्हणून 25 मार्च 1994 रोजी अक्कलकोटला आलेल्या लती दीदींनी स्वामीसेवा म्हणून भक्तांसाठी चक्क स्वयंपाकगृहात जाऊन पोळ्या लाटल्या होत्या. तर, जन्मेजयराजेंनी दोन गाड्याही भेट दिल्या आहेत.
सन २०१२च्या काळात जन्मेजयराजे भोसले यांच्या आग्रहाखातर लतादीदींनी श्री स्वामी समर्थांवर आधारित महामंत्र व भक्तिगीते गायली आणि स्वामीसेवा म्हणून त्या सीडी स्वरूपात स्वामी चरणी अर्पण केल्या. अन्नछत्र मंडळाच्या आवारात आगळीवेगळी शिवसृष्टी साकारण्याविषयी जन्मेजयराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. दीदींच्या शब्दाला मान देत आजघडीला अन्नछत्र मंडळाच्या आवारात शिवरायांच्या जन्मापासून शेवटपर्यंतच्या इतिहासावर आधारित धातुशिल्प शिवसृष्टी साकारण्यात आली आहे.
लतादीदींकडून जन्मेजयराजेंना मर्सिडीज भेट..
जन्मेजयराजे भोसले व अन्नछत्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची दीदींकडे सततचे जाणे-येणे असायचे. लतादीदींनी आपल्या स्वतःच्या वापरातील महागड्या असलेल्या मर्सिडीज व शोव्हरलेट या दोन गाड्या जन्मेजयराजे भोसले यांना भेट स्वरूपात दिल्या आहेत. या दोन्ही गाड्या अन्नछत्र मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ खास शेड उभारून लतादीदींचा आशीर्वाद-रथ म्हणून जतन केल्या आहेत.
अन्नछत्रचे छत्र हरपले
भारतरत्न, गानसम्राज्ञी स्व. लतादीदी यांच्या जाण्याने अन्नछत्रचे छत्र हरपले आहे. लतादीदींनी मला आपल्या घरातील माणसे असा ग्रंथात उल्लेख करून मोठे स्थान दिले आहे. अन्नछत्राच्या विकासकार्यात त्यांचे सदैव मार्गदर्शन लाभत असे. संगीताच्या क्षितिजावरील स्वराचा ध्रुवतारा आज निखळला आहे.
- जन्मेजयराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ