सांगोला : महाराष्ट्र विधानसभेतील अभ्यासू, जमिनीशी नाळ जोडलेला जनतेचा नेता म्हणून स्व. गणपतराव देशमुखांचे नाव आहे. शेकाप पक्षाचे स्वर्गीय माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळांची उंची वाढविण्याचे काम केले, अशा तत्वनिष्ठ व्यक्तीचे अतिशय उचित स्मारक हे महाराष्ट्र विधान मंडळाने बनविले पाहिजे, त्यांची उंची इतकी मोठी होती की, महाराष्ट्र विधानमंडळाच्या आवारामध्ये त्यांचा स्मारक रुपी पुतळा उभारावा त्यासाठी मी सरकारला भेटून विनंती करणार असल्याचे मत महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगोल्यात व्यक्त केले.
स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगोल्यात येऊन त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून देशमुख कुटुंब यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, रतनबाई देशमुख, पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबाचे सर्व सदस्य भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.