सांगोला : आरेवाडी येथून कुटुंबाला घेऊन घराकडे निघालेल्या लातूर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या कारचा पाठलाग करून त्यांच्या कारला जीप आडवी लावून लोखंडी गज व काठीचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या खिशातील १० हजार रुपये काढून घेतले व त्यांच्या कारचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना सांगोला-मिरज हायवेवरील काळूबाळूवाडी नजीक घडली. मंगळवार २७ मार्च रोजी सकाळी समोर आली़
मूळचे सोनके (ता. पंढरपूर) सध्या गांधी चौक, पोलीस ठाणे, लातूर येथील सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके शनिवार २४ मार्च रोजी दु. ४ च्या सुमारास स्विफ्ट कारमधून कुटुंबासह आरेवाडी (ता. कवठे महांकाळ) कडून सांगोल्याकडे निघाले होते. त्यांची कार मिरज हायवेवरील काळूबाळूवाडीनजीक आली असता पाठीमागून (क्र. एम.एच.४५/एन.०५५८) राखाडी रंगाच्या बोलेरो जीपमधून दत्तात्रय बंडगर, हणमंत हाके, सागर दुधाळ (सर्व रा. रायवाडी, ता. कवठे महांकाळ) व इतर दोघा जणांनी सपोनि सत्यवान हाके यांच्या स्विफ्ट कारचा पाठलाग करुन जुनोनी गावात आल्यावर कारला जीप आडवी लावली.
यावेळी त्यांनी सपोनि हाके यांना लोखंडी रॉड व काठीचा धाक दाखवून खिशातील १० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी त्या पाच जणांनी स्विफ्टच्या काचा फोडून नुकसान केले व तेथून पोबारा केला. याबाबत सत्यवान मधुकर हाके यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दत्तात्रय बंडगर, हणमंत हाके, सागर दुधाळ यांच्यासह पाच जणांवर भा.दं.वि.कलम ३९५ अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.