सोलापूर : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने रस्ता सुरक्षेसाठी अभियान राबवले जात असून, सध्या शहर व जिल्ह्यात यासंदर्भातील सप्ताह सुरू आहे. मात्र या अभियानाअंतर्गत पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. नियम आणि दंड केवळ सामान्यांसाठी आहेत की काय? अशी चर्चा शहरवासीयांमधून व्यक्त केली जात आहे.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परिवहन विभाग, शहर व जिल्ह्यातील वाहतूक शाखेचे पोलीस, शालेय शिक्षण विभाग व इतर संस्था व संघटनांच्या वतीने जनजागृती व जनप्रबोधनाकरिता विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सुरक्षा अभियानांतर्गत चौकसभा घेणे, बॅनर लावणे, माहितीपत्रके, हॅन्डबिल, वाहनचालकाची वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित केली जात आहे. अपघातामधील जखमींचा जीव वाचवणे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे असे अनेक उपक्रम सध्या राबविले जात आहेत.
दुचाकी चालविताना मोबाइलवर बोलल्यास दंड होतो. चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट न लावल्यास चालकावर दंड होतो. थांबा पहा... मग जा... रस्त्याचे नियम, सिग्नलची माहिती विविध प्रकारचे मार्गदर्शन सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या दरम्यान केले जात आहे. दि.१ जानेवारी रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताहचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष काणे, ग्रामीण वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात यामध्ये रस्ता सुरक्षा हा सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले मात्र याच विभागातील वाहनचालक नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहे. शहरातील रस्त्यावरून बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत जाणारे पोलीस कर्मचारीही ठिकठिकाणी आढळून येतात. एकीकडे प्रबोधन, तर दुसरीकडे उल्लंघन असा प्रकार सध्या शहर पोलीस आयुक्तालयातील व ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून पाहावयाला मिळत आहे.
पोलिसांनी दुचाकीने नियम तोडले
शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये कर्तव्यावर जाणाऱ्या एक पोलीस कर्मचारी चक्क दुचाकीवर मोबाइल टॉकिंग करताना आढळून आला. आपण पोलीस कर्मचारी आहोत आपल्याला कोणाची काय भीती अशा आविर्भावात जणू पोलीस कर्मचारी बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असल्याचे दिसून आले.
पोलीस चालकाला नियम नाहीत?
शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त रूपाली दरेकर या नियोजन भवनामध्ये बैठकीसाठी आल्या होत्या, मात्र त्यांच्या चालकाने नियमानुसार सीट बेल्ट लावलेला नव्हता. जाताना-येताना दोन्ही वेळेस चालकाने बेल्ट लावण्याचे कष्ट घेतले नाही.
एसपीचे ड्रायव्हरही विनाबेल्ट
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते याही नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगसाठी हजर होत्या. मात्र येताना व जाताना त्यांच्याही ही चालकाने सीट बेल्ट लावला नसल्याचे दिसून आले. एसपीच्या गाडीवरील ड्रायव्हरने सीट बेल्ट लावला नसल्याने जागरूक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.