पोलीस हवालदार भागवत पांडुरंग झाेळ (वय ५२) आणि पांडुरंग रिसवडकर (वय ४०, रा. सूजयनगर, अकलूज) असे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका युवकाने लाचलुचपतकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारदार व त्यांचे वडील यांचेविरुद्ध वेळापूर पोलिसांनी ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक करून जामिनासाठी मदत करण्यासाठी हवालदार झोळ याने ५ हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत कार्यालय गाठून तक्रार नोंदवली. वेळापुरात महादेव मंदिर ट्रस्टच्या गाळ्यासमोर पंचांसमक्ष लाचेची रक्कम झोळ याने स्वीकारली आणि रिसवडकर या वकिलाने याला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उस्मानाबाद लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, अंमलदार अर्जुन मार्कड, विष्णू बेळे, विशाल डोके, सिद्धेश्वर तावस्कर, करडे यांच्या पथकाने कारवाई केली.