सोलापूर : गुलबर्गा येथील केस द्यायची आहे असे कारण पुढे करत घरी बोलावून राजेश कांबळे या वकिलाचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणामध्ये गुरुवारी मुख्य आरोपी संजय उर्फ बंटी खरटमल याला अटक केली असताना शुक्रवारी आणखी एका पेशाने वकील असलेल्या सुरेश तारु चव्हाण (वय ३९, रा. मुस्तीतांडा, ता. दक्षिण सोलापूर) यास पोलिसांनी सिंदगी येथे अटक केली. दरम्यान, काळा कोट घालण्यापूर्वी त्याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे.
बंटीने राजेशचा खून सुरेश चव्हाण याच्या सांगण्यावरुन केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
या सबंध सोलापूर जिल्ह्यात खळबळ माजवणाºया घटनेबद्दल भाऊ मिलिंद याने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी शोध घेतल्यानंतर भयाण घटना समोर आली. यानंतर संजय उर्फ बंटीविरु द्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपासाची चक्रे फिरवून गुलबर्गा रेल्वेस्टेशनवर तो गुन्हे शाखेच्या पथकाला सापडला. गुन्हे शाखेने तपास करुन त्याला सदर बझार पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
तपासामध्ये आरोपी संजय उर्फ बंटीने राजेशचा खून केल्यानंतर त्याच्याच मोटरसायकलवरुन अक्कलकोट गाठले. तेथे वाहन सोडून तो परत रेल्वेने सोलापुरात आला. येथून पुढे कर्नाटकात सासरवाडी असलेल्या नरुला (जि. कलबुर्गी) येथे गेला असल्याची माहिती मिळाली. त्याचा माग घेऊन त्याला अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीमध्ये वकील असलेल्या सुरेश तारु चव्हाण (वय ३९, रा. मुस्ती तांडा, ता. द. सोलापूर) याचे नाव समोर आले आहे. त्याला आज सायंकाळी अटक करण्यात आली. उद्या (शनिवारी) त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात येणार आहे. त्याच्या तपासामध्ये आणखी नवी माहिती पुढे येते काय? याचा शोध आम्ही घेत आहोत, असे उपायुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्य आरोपी असलेल्या संजय उर्फ बंटी याला शुक्रवारी न्यायदंडाधिकाºयासमोर उभे करण्यात आले. गुन्ह्याचे गंभीर स्वरुप पाहता आरोपीने थंड डोक्याने गुन्हा केला आहे. गुन्ह्याचा कट कसा रचला, यात कोण कोण सहभागी आहेत यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. न्यायालयाने सरकारी वकील अॅड. संतोष पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन २१ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावला. या प्रकरणातील मूळ फिर्यादीचे वकील संतोष न्हावकर यांनी बाजू मांडली.
काय म्हणाले सरकारी वकील- राजेश कांबळे खून खटला हा अतिशय गुंतागुंतीचा असून, त्याचा पुढील तपास हा आरोपीच्या हजेरीमध्ये व त्याला प्रत्यक्ष घेऊन पोलिसांना करावा लागणार आहे. मयत वकिलावर झालेला हल्ला संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या केसमध्ये वापरात आलेल्या वस्तू, आरोपीचा हेतू, उद्देश याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील संतोष पाटील यांनी न्यायालयासमोर केला. न्यायालयाने सर्व मुद्दे मान्य करुन संजय उर्फ बंटी खरटमल याला २१ जूनपर्यंत म्हणजे ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सुरेश चव्हाणवर सात गुन्हे- शुक्रवारी सायंकाळी अटक केलेल्या सुरेश तारु चव्हाण याच्याविरुद्ध २०११ पूर्वी दुचाकी चोरीचे तीन आणि घरफोडीचे चार असे सात गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. संबंधित घटना केस मागे घेण्यावरुन घडली असल्याची चर्चा सुरु आहे.
आणखी कोण कोण़़़ तपास सुरु- मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. न्यायालयाकडून तपासासाठी पोलीस कोठडी मिळवली आहे. आरोपीच्या कबुलीनंतर आपण हे कृत्य सुरेश तारु चव्हाण याच्या सांगण्यावरुन केले असल्याचा गौप्यस्फोट संजय उर्फ बंटीने केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. लोकेशनचा आधार घेत कर्नाटकातील सिंदगी येथे अटक केली.