सोलापूर : जिल्ह्यात गुन्हे करणाऱ्यांना ताब्यात घेणाऱ्या सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) पथकाला आता चक्क आरोग्य विभागाच्या पथकाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलिसांनाच 'कोरोना'ची लागण झाल्याचे शनिवारी उघड झाल्यावर ही खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच आकाशवाणी केंद्राजवळील गवळी वस्तीत एका किराणा दुकानदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर शहर पोलिसांनी हा भाग सील केला आहे.
शहर व जिल्ह्यातून आतापर्यंत १९७२ रुग्ण उपचारास दाखल करण्यात आले, त्यातील १६७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर अद्याप ३०१ जणांचे अहवाल यायचे आहेत. शनिवारी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११४ झाली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन शिपाई आहेत. यातील एक शिपाई एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) येथे नेमणुकीला आहे तर दुसरा मुख्यालयाच्या निरीक्षकांबरोबर रात्रगस्तीला असतो. हे दोघेही ग्रामीण पोलीस मुख्यालयातील एकाच खोलीत राहत आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार पोलिसांनी या दोघांची हिस्ट्री तपासून त्यांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी क्वारंटाइन केले आहे. यामध्ये एलसीबीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एक जण एलसीबीत नेमणुकीला असून, २१ एप्रिलपासून त्यांची ड्यूटी सांगोला तालुक्यातील सोनंदच्या सीमा तपासणी नाक्यावर होती. पुन्हा २५ रोजी ड्यूटीवर गेले. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने २६ एप्रिल रोजी सोलापूरला परतले होते. त्यांचे सहकारी हेही दररोज रात्रगस्तीला जात होते. या दरम्यान त्यांनी अनेक फिक्स पाॅइंटवर तपासणी केलेली आहे. ३० एप्रिल रोजी दोघांनाही सारख्याच प्रकारचा त्रास होऊ लागल्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब घेतले असता दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
किराणा दुकानदाराला लागण
शहरात दुसऱ्यांदा किराणा दुकानदाराला कोरोनाची लागण झाली आहे. आकाशवाणी केंद्राजवळील गोदावरी नगरात राहणाऱ्या ७० वर्षीय किराणा दुकानदाराला सारीची लागण झाल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण संचारबंदी काळात त्यांनी किराणा दुकानातून दूध विकल्याचे सांगण्यात येत आहे. त्रास होऊ लागल्याने ३० एप्रिल रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर हा भाग सील करून त्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे.
दुबार चाचणीत दोन महिला पॉझिटिव्ह
यापूर्वी पॉझिटिव्ह म्हणून उपचारास दाखल केलेल्या दोन महिलांचे १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेण्यात आली. तेलंगी पाच्छापेठेतील ७० वर्षीय वृद्धा २० एप्रिल रोजी तर कुर्बान हुसेन नगरातील ५७ वर्षीय महिला १७ एप्रिल रोजी उपचारास दाखल झाली होती. त्यांना घरी सोडण्यासाठी दुबार चाचणी घेतल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.