सोलापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असून सरकारमधील नेते हे सर्कसमधील विदूषक आहेत, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मंगळवारी दुपारी पूनम गेटवर आयोजित आंदोलनात खोत बोलत होते.
सन २०२१ व २०२२ मधील गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील पूनम गेटवर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा आणला. मोर्चात बोलताना त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला. एफआरपीसोबत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील पूनम गेटवर मोर्चा आला. मोर्चातील कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार विराेधी फलके घेऊन शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त पूनम गेटवर तैनात होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रयत क्रांती संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला संजय कोकाटे व छावा संघटनेने पाठिंबा दिला. मोर्चामध्ये रयत क्रांती संघटनेचे शेतकरी उसाची मोळी घेऊन सहभागी झाले.
यावेळी दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात, अशोक भोसले, दशरथ जाधव, लालासाहेब पाटील कोल्हापूर, प्रा. सुहास पाटील, प्रा. एन. डी. पाटील आदीसह रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यात यावी
महाविकास आघाडी सरकारचे प्रणेते शरद पवार यांनी ठरविल्यास शेतकऱ्यांना सहज एकरकमी एफआरपी मिळेल. एफआरपीचा प्रश्न त्यांनी केंद्राकडे ढकलला असून ते चुकीचे आहे. सहकारी साखर कारखाने आणि सहकार मोडीत काढण्याचे काम पवारांनी सांभाळलेल्या नेत्यांनी केले. पवारांनी सांभाळलेले नेते धष्टपुष्ट राहावेत, यासाठी एफआरपी तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला गेला. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यात यावी, या मागणीसाठी आमचा लढा सुरू राहील, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
...........................