सोलापूर : आमचं काळीज.. आमचे दैवत.. ढाण्या वाघ.. अशा होर्डिंग चौकाचौकात लटकलेल्या दिसतात. नेत्याचा वाढदिवस आला लावा होर्डिंग.. मुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष, मंत्री, वरिष्ठ नेते आले की लावले होर्डिंग.. उद्घाटन सोहळा आल्यावरही लटकतात होर्डिंग.. सण-उत्सवाला तरी शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागते. या होर्डिंगमुळे शहरांचे विद्रुपीकरण होत आहे. तरीही नेतेमंडळी स्वत:ची पाठ थोपवून घेण्याच्या नादात होर्डिंगला प्रोत्साहन देतात. अधिकारीही त्या कानाडोळा करतात. त्यामुळे न्यायालयाचे आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे.
सोलापूर शहरात अनधिकृत होर्डिंग लावण्यास बंदी आहे. तरीही मोठमोठ्या नेत्यांच्या स्वागतासाठी कमानी, चौकाचौकात होर्डिंग लावतातच. महापालिका प्रशासनांकडून कारवाई होत नाही. त्यामुळे गल्लीबोळातील कार्यकर्तेही बिनधास्त मोठमोठे होर्डिंग लावतात. जेव्हा मोठे नेते शहरात येतात तेव्हा, सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह, विमानतळाच्या बाहेर, पार्क चौक परिसरात होर्डिंग मोठ्या प्रमाणात दिसतात. मी साहेबांच्या किती जवळ आहे, हे दाखविण्यासाठी चढाओढ लागलेले असते. अशावेळी महापालिकेकडून जुजबी कारवाई केल्याचे दाखवितात. जोपर्यंत नेतेमंडळी कार्यकर्त्यांना फटकारत नाही, तोपर्यंत होर्डिंग कमी होणार नाही.
.........
नेते दर्शनासाठी, कार्यकर्ते होर्डिंगवर
पंढरीच्या विठुरायांच्या, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी नेतेमंडळी येत असतात. तीच संधी साधून कार्यकर्ते त्यांच्या स्वागताचे होर्डिंग लावतात. याशिवाय बार्शी, कुर्डूवाडी, मोहोळ या शहरातही मोठ्या प्रमाणात होर्डिंग दिसतात. बार्शी व पंढरपुरातच मोठ्या प्रमाणात फलक दिसतात. विशेष म्हणजे होर्डिंग लावताना नगरपालिकेकडून परवानगी देत नाहीत आणि नगरपालिकेकडूनही कारवाई होत नाही.
................
आदेशाची पायमल्ली
अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनरवर कारवाई करताना त्याचे व्हिडिओ शूटिंग करणे किंवा फोटोग्राफ काढणे किंवा पंचनामा करण्याचे निर्देशही हायोकोर्टाने दिले आहेत. याशिवाय टोल फ्री नंबर प्रसिद्ध करून त्यावर येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
...........
कारवाई करू
नगरपालिकेकडे रितसर पैसे भरून होर्डिंग लावण्यास परवानगी आहे. राजकीय होर्डिंग लावताना त्या होर्डिंगवर काय असणार आहे, याचा उल्लेख परवानगी घेताना असणे बंधनकारक आहे. कोरोनामुळे होर्डिंग लावणाऱ्यांवर फारशी कारवाई झालेली नाही. यापुढील निवडणुकीच्या तोंडावर होर्डिंग लावण्यासाठी चढाओढ असते. त्यामुळे यापुढे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनाही याबाबत कळविण्यात येईल.
- अमिता दगडे-पाटील, मुख्याधिकारी, बार्शी
.......
फोटो : होर्डिंग