राकेश कदम
सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मंगळवारचा दिवस रोमहर्षक क्रिकेट सामन्यासारखा राहिला. मुंबईत घडणाºया या राजकीय सामन्याकडे शहरातील राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिल्याचे दिवसभर पाहायला मिळाले.
भाजपच्या नेत्यांनी सरकार बनविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप नेते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत तर होते, पण संघटनात्मक कामे सुरूच होती. भाजपच्या शहर कार्यालयात शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी कार्यकर्त्यांसोबत संघटनात्मक नेमणुकांबाबत चर्चा केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, म्हाडाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील एका कामासाठी शासकीय विश्रामगृहात एकत्र आले होते.
परंतु, क्षणाक्षणाला ते मुंबईतील घडामोडी जाणून घेत होते. शिवसेनेचे कार्यकर्ते सोमवारी रात्री बॅकफुटवर गेले होते. काँग्रेसचे नेते मंगळवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांच्या आशा पुन्हा जागृत झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रपती राजवटीचे वृत्त आल्यानंतर त्यांचा पुन्हा हिरमोड झाला होता.
मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर बॅकफुटवर गेलेले कार्यकर्ते पुन्हा जोशात आले. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे आदी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईलवरून घडामोडी जाणून घेत होती. शहर शिवसेना कार्यालयात जिल्हाप्रमुख गणेश वानकर, नगरसेवक राजकुमार हंचाटे, भारतसिंग बडूरवाले, परिवहन सदस्य विजय पुकाळे यांच्यासह कार्यकर्ते मुंबईसह महापालिकेतील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात दंग होते. सत्ताकारणाचा केंद्रबिंदू शरद पवार असल्याने राष्टÑवादीसोबत काँग्रेसचे कार्यकर्ते मंगळवारी जोशात होते. तासातासाला ते सोशल मीडियावर भाजपच्या कार्यकर्त्यांना चिमटे काढत असल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी भवनात शुकशुकाट होता.
चिंता नाही, साहेब बघून घेतील...- शहर राष्ट्रवादी कार्यालयात शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रमोद भोसले, शाम गांगर्डे एकत्र आले तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचे वृत्त धडकले होते. चौघेही मोबाईलवरून मुंबईच्या घडामोडी जाणून घेत होते. राष्ट्रपती राजवटीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात तुमचे स्वागत आहे, अशा शब्दांत जाधव आणि पवार यांनी पत्रकारांचे स्वागत केले. राष्ट्रपती राजवट आली म्हणून चिंता नाही... साहेब (शरद पवार) बघून घेतील, असे जाधव बोलून गेले.
इथे लगेच होते आंदोलनाची तयारी- काँग्रेस भवनात दुपारनंतर शुकशुकाट होता. नेहमीच आंदोलनाच्या तयारीत असलेले नगरसेवक विनोद भोसले, अंबादास करगुळे आणि त्यांचे सहकारी राष्ट्रपती राजवटीचे वृत्त आल्यानंतर काँग्रेस भवनात दाखल झाले. राज्यपाल राजकीय हेतूने काम करीत आहेत. पक्षाकडून ऐनवेळी आंदोलनाचा आदेश आलाच तर उशीर नको म्हणून पोहोचल्याचे दोघांनीही सांगितले.