सोलापूर : कोरेगाव भीमा येथे एक तारखेला दंगल झाली आणि दोन तारखेला सकाळी राज्यातील महानेत्याला शोध लागला की यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात आहे. त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे गावोगावी दंगली पेटल्या, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.पाटील म्हणाले, कोरेगाव भीमामध्ये भाजपचा हात होता की काँग्रेसचा हे एनआयएच्या चौकशीतून पुढे येणार आहे. ही समिती यात आणखी कुणाकुणाचा हात होता हे पुढे तपासणार आहे.आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. उलट गेल्या पाच वर्षात आम्ही जे जे केले त्याची तुम्ही चौकशी करा. नुसत्या बढाया कशाला मारता. शहरी नक्षलवाद सिद्ध झाला आहे. बऱ्याच जणांची नावे समोर येतील, असेही ते म्हणाले.महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा हात असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. त्यावर पाटील म्हणाले, गांधींच्या हत्येनंतर या देशात अनेक कमिशन्स स्थापन झाली. त्या काळातील सर्व कमिशनच्या चौकशीतून हे पुढे आले की यात संघाचा हात नव्हता. आता तुम्हाला आणखी कमिशन स्थापन करायची असतील तर करा.मुस्लिम आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे. मुस्लिमांमध्ये गरीबी आहे. खरे तर दोन किंवा दहा टक्के मुस्लिमांना आरक्षणाचा लाभ मिळणे राहिले आहे.धर्माच्या आधारे आरक्षण देण्याची तरतूद आपल्या घटनेत नाही. आंध्र सरकारने देण्याचा प्रयत्न केला पण कोर्टात ते टिकले नाही, असेही पाटील म्हणाले.‘सारथी नव्हे तर पारथी काढा’महाआघाडी सरकार लोकांच्या कल्याणाच्या चांगल्या योजना बंद करीत आहे. मराठा समाजातील मुलांसाठी काढलेली सारथी संस्था बंद पाडली जात आहे. तुम्हाला काढायची असेल नवीन पारथी संस्था काढा. पण समाजातील मुलांवर अन्याय करु नका, असेही त्यांनी सांगितले.
महानेत्याच्या विधानामुळे गावोगावी दंगली पेटल्या, कोरेगाव-भीमाप्रकरणी चंद्रकांत पाटील यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 5:03 AM