शासनाने यावर्षी एकूण थकीत वीज बिलातून ५० टक्के सूट देण्यासाठी कृषी धोरण-२०२० योजना आणली. त्यास ग्राहकांकाडून चांगला प्रतिसाद मिळाला.
अक्कलकोट तालुक्यात घरगुती ग्राहक १५ हजार ३९ इतके असून, ६ कोटी १ लाख वीज बिल वसुली थकीत होती. औद्योगिक ग्राहकांची संख्या ३२७ इतकी असून, १ कोटी ८ लाख रुपये रक्कम थकीत आहे. व्यापारी ग्राहक १ हजार १८७ असून, १ कोटी २५ लाख वसुली थकीत होती. सर्वाधिक ग्राहक व वसुली रक्कम असलेली शेतीचे तब्बल २३ हजार ५३४ ग्राहक संख्या असून, १७२ कोटी रुपयांची रक्कम थकीत होती. त्यामधून शासनाच्या नवीन धोरणानुसार ५० टक्के सूट देऊन १११ कोटी २३ लाख रुपये भरणे बंधनकारक होते.
मार्च-२१ मध्ये संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मनाशी खूणगाठ बांधून थकीत वीज बिल वसुलीला सुरुवात केली. त्यासाठी काही कटू अनुभवसुद्धा घ्यावे लागले. मात्र, मार्चअखेर जिल्ह्यात वसुलीत आघाडी घेतली आहे.
शेतीपंपाचा पावणेतेरा कोटींचा भरणा पूर्ण
शेतीपंपाच्या ९ हजार २९३ ग्राहकांनी १२ कोटी ६४ लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. त्याबरोबरच व्यापारी, औद्योगिक, घरगुती, असे १९ कोटी रुपये वसुली करण्याचा विक्रम नोंदवला आहेत.
ग्रामपंचायत स्तरावरचा निर्णय ठरला निर्णायक
नवीन कृषी योजनेनुसार वसुली झालेल्या रकमेतून ३३ टक्के रक्कम ज्या- त्या गावात ग्रामपंचायत स्तरावर खर्च करावयाची, असा निर्णय शासनाने घेतला आहे. हाच निर्णय निर्णायक ठरला आहे. त्या माध्यमातून त्या भागात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, पोल बसविणे, तारा ओढणे, आदी प्रकारची कामे केली जाणार आहेत. याचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सर्व प्रकारचे मिळून २८ हजार ३९१ ग्राहकांनी बिलापोटी १९ कोटी रुपये भरले आहेत.
कोट ::::::::
तालुक्यातील ग्राहकांकडून थकीत वीज वसुलीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी धोरण-२०२० या योजनेचा शेतकऱ्यांनी पुरेपूर फायदा उचलला आहे. ३१ मार्च २२ पर्यंत ही योजना चालू राहणार आहे. तरी उर्वरित ग्राहकांनीसुद्धा याचा लाभ घ्यावा. यंदा तब्बल १९ कोटी रुपयांची वसुली केली असून, जिल्ह्यात अक्कलकोट तालुका आघाडीवर राहिला आहे. याचे श्रेय अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांना जाते.
-संजीवकुमार म्हेत्रे,
उपकार्यकारी अभियंता