जिल्ह्यात ऊस गाळप करण्यात व पहिली उचल देण्यात विठ्ठलराव शिंदे कारखाना तर मोहोळ तालुक्यात ऊस गाळपात २ लाख टनांचा टप्पा पार करून लोकनेते शुगरने आघाडी घेतली आहे. टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्याने गाळप कमी केले तरी प्रतिटन २ हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल दिली आहे.
साखर कारखाने चालू होऊन दोन महिने झाले तरी अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी किती आहे आणि आपण पहिली उचल किती देणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने आजअखेर ५ लाख ८० हजार मेट्रिक टन गाळप करून पहिली उचल प्रति टन २ हजार रुपये दिली. श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्याने ३ लाख १८ हजार टन गाळप करून पहिली उचल प्रतिटन २,१०० रुपये जाहीर करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. मोहोळ तालुक्यातील अनगरच्या लोकनेते कारखान्याचे २ लाख ४६ हजार टन गाळप झाले असून, पहिली उचल प्रतिटन १,८०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा केली. वटवटे येथील जकराया शुगरने आतापर्यंत १ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप केले; मात्र पहिली उचल अद्याप जाहीर केली नाही. टाकळी सिकंदर येथील भीमा कारखान्याने ५६ हजार टन ऊस गाळप केला असून, पहिली उचल २ हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे.
कचरेवाडी येथील युटोपीयन कारखान्याने २ लाख २० हजार टन गाळप केले असून, प्रतिटन १,७०० रुपयांप्रमाणे पहिली उचल जाहीर करून बँक खात्यात जमा केली आहे. सिद्धेश्वर कारखाना व तिर्हे येथील सिद्धनाथ कारखान्यानेही दोन लाखांहून अधिक मेट्रिक टन ऊस गाळप केले असले तरी अद्यापही पहिली उचल जाहीर केली नाही . यामुळे ऊस लागवडीपासून ऊस तोडणी होईपर्यंत १५ महिने जिवापाड जपलेल्या उसाला दर किती मिळतो, याची शेतकऱ्यांना अजूनही वाट पाहावी लागत आहे.