मोहोळ : शहराला पिण्याचा पाणीपुरवठा करणार्या टाकीच्या पाईपलाईनला गेल्या महिन्यापासून गळती आहे़ त्यामुळे त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे़ वाढती पाण्याची मागणी आणि भविष्यात होणारी पाणीटंचाई यामुळे ही गळती रोखणे गरजेचे आहे; मात्र ग्रामपंचायतीची यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते़ ४० हजार लोकसंख्या असणार्या मोहोळ शहराला कोळेगाव बंधार्यातून पाणीपुरवठा केला जातो़ सध्या उजनी धरणातून वेळेवर सीना नदीद्वारे बंधार्यात पाणी आल्याने सध्या पाणीटंचाई जाणवली नाही, परंतु सध्यस्थितीला धरणातील पाण्याची पातळी सीना बोगद्याच्या पातळीबरोबर आल्याने भविष्यात येणारे पाण्याचे रोटेशन येणार नाही़ त्यामुळे जून महिन्यात बंधार्यातील पाणी संपल्यास शहराला पाणीटंचाईला तोड द्यावे लागणार आहे़ अशी स्थिती असताना बंधार्यातून शहराला पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनला शहरात दोन ठिकाणी गळती सुरू आहे़ ही गळती रोखणे गरजेचे आहे, परंतु अद्याप ग्रामपंचायतीने ती बंद करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही़ गळती असणार्या रस्त्यावरून ग्रामपंचायत पदाधिकारी ये-जा करतात; मात्र गळतीकडे लक्ष दिले नाही़ ही गळती चालूच राहिली तर जून महिन्यात शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार हे निश्चित़
---------------------
सुरुवातीला गळती प्रमाणात होती पुढे वाढत गेली. गावची यात्रा सुरु असल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून कामाला विलंब लागला. मंगळवारी एक दिवसात युद्धपातळीवर काम करुन गळती बंद करण्यात येईल. - सतीश काळे, उपसरपंच, मोहोळ
-----------------------------------
छोट्याशा कामाला कामगार वेळेवर मिळत नाहीत. या कामासाठी सोलापूरहून कामगार मागवावे लागतात. दोन दिवसात गळती बंद करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. -सीताराम केसकर, ग्रामविकास अधिकारी, मोहोळ