जाणून घ्या; घरच्या घरी गणपती विसर्जनाचा हा आहे सोपा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 01:18 PM2020-08-28T13:18:20+5:302020-08-28T13:20:43+5:30
सोलापूर लोकमत विशेष...
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : गणेश विसर्जन काहीच दिवसांवर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तलावात विसर्जन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे घरीच विसर्जन करावे लागणार आहे. शाडूची मूर्ती असेल तर काही अडचण नाही. मात्र, मूर्ती प्लॅस्टर आॅफ पॅरिसची असेल तर लवकर विरघळणार नाही. यामुळे विसर्जन करताना खाण्याचा सोडा पाण्यात वापरला तर मूर्ती लवकर विरघळेल, असे तजज्ञांनी सांगितले.
प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती खाण्याचा सोडा घातलेल्या पाण्यात ठेवावी. ७२ ते ९६ तासांमध्ये मूर्ती विरघळते. त्यापासून प्लॅस्टर आॅफ पॅरिस, गवत, रंग व अन्य घटक सुटे होतात. मूर्ती विरघळल्यानंतर भांड्यातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये, तर पीओपीचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते. हे पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते.
यंदाच्या वर्षी जनजागृती झाल्याने सोलापूरकरांनी शाडूच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीस पसंती दिली. २० हजारांहून अधिक जणांनी शाडूची मूर्ती खरेदी केली, अनेकांना शाडूची मूर्ती मिळाली नाही. त्यामुळे अशा भाविकांनी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीची खरेदी केली. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. यामुळे विसर्जन करताना पाण्यात खाण्याचा सोडा घालण्याचा पर्याय चांगला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मूर्तीच्या वजनाइतका वापरावा खाण्याचा सोडा
श्री गणेशमूर्ती पूर्ण सामावू शकेल, अशी बादली प्रथम घ्यायला हवी. त्यात पुरेसे पाणी ओतावे. जितके वजन मूर्तीचे आहे, तितक्याच वजनाचा खाण्याचा सोडा बादलीमध्ये टाकावा. एका काठीने मिश्रण ढवळावे. सोडा पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्यात गणेशमूर्ती ठेवावी. त्यानंतर दर दोन तासांनंतर बादलीमध्ये काठीने ढवळावे. साधारणपणे ७२ ते ९६ तासांमध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळते. मूर्ती विरघळल्यानंतर त्याचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो.
गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करताना त्यात खाण्याचा सोडा वापरावा. हा प्रयोग पुणे महापालिकेने यशस्वी करून दाखविला आहे. यामुळे तलावात न जाता घरीच भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन करता येते. विसर्जन केल्यानंतर त्याचा वापर आपल्या बागेमध्ये खत म्हणून करता येतो.
- डॉ. निनाद शहा, पर्यावरण अभ्यासक.