करमाळा : गावातील मंदिरासमोर, पारावर व घराच्या उंबºयावर, इतकेच काय तर घरातील पलंगावर सुद्धा नाग येऊन बसतो़ पण त्यास कोणीही मारण्याचा प्रयत्न करीत नाही़ त्याचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर तोही कोणाला दंश न करता निघून जातो़ नागपंचमीला तर महिला जिवंत नागाचीच पूजा करतात़ ही परंपरा आहे शेटफळ (ता़ करमाळा) गावातील़ यामुळे गावाला नागोबाचे शेटफळ म्हणून ओळखले जाते.
नागनाथ हे या गावचे ग्रामदैवत असून, गावाच्या शिवारात कोब्रा जातीच्या नागांची संख्या मोठ्या जास्त आहे. गावात नागांचा मुक्तपणे वावर असतो, परंतु या ठिकाणी दिसणाºया नागांना कोणीही मारत नाही़ त्यांची पूजा केली जाते. घरात, गावात निघालेल्या नागांना छोट्या काठीवर घेऊन गावाच्या बाहेरील मंदिराजवळील मोकळ्या जागेत सोडले जाते. नागनाथावर या गावाची अपार श्रद्धा असून, येथे नाग गावातील सदस्याप्रमाणेच वास्तव्य करतात.
या गावात नागोबाला अभय असल्यामुळे त्याच्याकडूनही कोणास धोका होत नाही. गावात प्राचीन हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले नागोबाचे मंदिर आहे. या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येतात.
सध्या गावात आढळणाºया नागांची संख्या हजारोंच्या संख्येने असली तरी नाग दंश करीत नाही़ या देवाची नागपंचमी व महाशिवरात्रीच्या दुसºया दिवशी यात्रा भरते. गावातील नागरिकांमध्ये नागाबद्दल अजिबात भीती नाही.
नागपंचमीला हमखास दर्शन होतेचनागपंचमी दिवशी या गावात हमखास नागाचे दर्शन होते. नागपंचमी दिवशी आढळलेल्या नागाला मैदानात ठेवून त्याच्या भोवती गावातील महिला गोलाकार करून नागपंचमीची गाणी म्हणतात. तो नाग शांतपणे थांबत असल्याचे पाहावयास मिळते़ त्यामुळे नागपंचमी दिवशी नाग दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी असते़ परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाच्या भीतीमुळे प्रशासनाने नागपंचमी उत्सवाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यंदा नागपंचमीला अनेकांना नाग दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे या दिवशी गावामध्ये कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे़
नागपंचमी शेटफळमधील महत्त्वाचा सण आहे़ प्राचीन काळापासून जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करण्याची गावची परंपरा आहे. गावात दिसणाºया नागांना मारले जात नाही. त्यांचे रक्षण केले जाते़ मात्र यावर्षी नागपंचमी उत्सवावर इतिहासात प्रथमच खंड पडत आहे़ प्रशासनाने परवानगी न दिल्याने लोकांची निराशा झाली आहे.- भारत पाटील,सदस्य, देवस्थान समिती.