परवाच एकाचा फोन आला होता, काय गोड गोड बोलत होता माणूस ! त्याच्या शब्दाशब्दातून साखर टपकत होती. याच्यासारखा सज्जन अन् ‘आपला’ माणूस दुसरा कुणी नसावा. असं वाटण्याइतपत त्यांचं बोलणं होतं. त्याच्या जिभेवरची बरीच खडीसाखर माझ्या कानात सांडली अन् आमचं फोनवरचं बोलणं संपलं. समोरच्याशी बोलण्याच्या नादात त्याच्याकडून फोन बंद करायचं राहून गेलं असावं ! जसं बोलणं बंद झालं तसं त्यानं माझी निंदा करायला सुरू केली. ते सगळंच मी फोनवर ऐकत राहिलो. तो समोरच्याला सांगत होता. ‘काय न्हाय हो, आपलं काम होईपर्यंत असंच गोड बोलावं लागतं, एकदा काम झाल्यावर कोण विचारतोय?’ त्याच्या गोड बोलण्याचं गणित मला त्याच्याकडूनच कळालं होतं. अर्थात तसा हा अनुभव माझ्यासाठी काही नवा नाही. कुणी गोड बोलायला लागलं की, नाही म्हणलं तरी धडकी भरायला लागते मनात. आपलं काम साध्य करून घेण्यासाठी गोड बोलण्याचं अस्त्र बाळगतात अनेक जण या दुनियादारीत !
एकदा काम झालं की साधी ओळखही द्यायला तयार नसतात ही माणसं ! प्रत्येकाच्याच वळचणीला दडून बसलेली असतात अशी गिधाडं ! कधी टोच्या मारायला सुरुवात करतील हे नाही सांगता यायचं ! पण दुनियाही यानाच भुलते राव ! रोखठोकपणे खरं बोलणारी माणसं नाहीत चालत या दुनियादारीला. गोड बोलणारी माणसं प्रामाणिक असतीलच असं नाही पण तोंडावर खरं सांगणारी माणसं प्रामाणिक असू शकतात याची कधी ना कधी प्रचिती येत असते. तरीही हरभºयाच्या झाडावर चढवणारी अन् काम झालं की जोरदार आपटणारी माणसं जवळची वाटतात या दुनियादारीत ! अन् मग पुन्हा बसतात गद्दारांच्या नावानं शंख करीत.
स्वार्थाशिवाय हल्ली कुणी कुणाशी काही बोलायलाच तयार नाही राव! नुकताच मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ अशा शब्दांची समाज माध्यमात गर्दी झाली. खरंच असं तीळगूळ देऊन अन् खाऊन कोणी गोड बोलला असता तर किती बरं झालं असतं नाही! सोशल मीडियावर इतका तीळगूळ सांडला की हातातला स्मार्ट फोनही चिकट झाला पण मनं मात्र परस्परांशी नाही चिकटली. समाज माध्यमांनी दुनिया जवळ आणली पण माणसं मात्र खूप खूप दूर गेलीत. नुसतं काहीतरी निमित्त हवं असतं. शुभेच्छांचा सडाच पडतो ! शुभेच्छा तर हव्याच हो, पण त्यात काही ओलावा ? काही नाही, नुसता कोरडेपणा उरलाय. सोशल मीडियावरून टोपलीभर तीळगूळ पाठविणारा माणूस समोर भेटला तर चिमुटभरही तीळगूळ द्यायला तयार नाही की गोड शब्दात ‘गोड बोला’ असं म्हणायला राजी नाही ! अर्थात ही विसंगतीचेही पडसाद याच माध्यमात उमटले म्हणा ! तीळगूळ खाऊन तरी माणसं खरंच गोड बोलणार का हो? खरं तर, ‘गोड बोला’ असं म्हणण्यापेक्षा ‘खरं बोला’ असं म्हणण्याचेच हे दिवस आहेत.
शिवाजी हळणवर यांनी समाजमाध्यमातून संक्रांतीच्या शुभेच्छा देताना एक संदेशही देऊन टाकलाय. ‘गोड गोड बोलण्यापेक्षा खरं अन् बरं बोललं पाहिजे’ असं सांगत दुनियादारीला आरसाच दाखवलाय. आमच्या नीलेश झालटे यांनी तर झणझणीत अंजनच घातलंय दुनियेच्या डोळ्यात. ‘गोड-गोड बोलण्यापेक्षा खरं बोला. स्पष्ट बोला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोंडावर एक अन् मागं एक असं बोलू नका, चांगलं वाईट बोलू या पण तोंडावर बोलू या ! असं आवाहनच त्यांनी केलंय. हल्ली अशीच प्रवृत्ती वाढलीय हो दुनियादारीत. तोंडावर गोड गोड बोलतात अन् मागं खायचं तेवढं शेण खातातच! काही वाटत नाही, अंगवळणीच पडून गेलंय हे सगळं !
माणसाचं माणसांशी बोलणं कमी झालंय, गावातल्या पारावरची गर्दी दिसेनाशी होऊ लागलीय. मनाची कवाडं बंद होत चाललीय, संवाद हरवत चाललाय. सोशल मीडियावर गतीनं बोटं हलताहेत पण जिभेवरचे शब्द जागीच गोठून चाललेत, हे मात्र खरे ! सण, उत्सवही आता व्हॉट्सअॅप, फेसबुकवर सुरू झालेत. चार जण एकत्र आले तर दोन मिनिटं बोलतात अन् प्रत्येकजण स्मार्ट फोनशी खेळत बसतात. एका टेबलावर जेवायला बसतात पण तिथंही परस्परात प्रचंड दुरावा निर्माण झालेला दिसतो. शब्द हे मनाशी मनाचं नातं जोडणारा दुवा आहे पण आज शब्दही निशब्द झालेत आजच्या दुनियादारीत ! तरीही संक्रांत आली की जो जो म्हणतो, ‘तीळगूळ घ्या, गोड बोला !’ आमचे महेंद्र गणपुले म्हणतात, ‘जिथं समाजातील संवादच हरवलाय तिथं ‘गोड बोला’ म्हणण्यापेक्षा किमान ‘बोला तरी’ असं म्हणायची वेळ आलीय. खरंच आहे की ! शब्दांना मुके नका करू, त्यांना बोलतं राहू द्या ! गोड बोला, तिखट बोला पण किमान ‘बोला’ तरी राव..! - अशोक गोडगे-कदम(लेखक हे साहित्यिक आहेत)