सोलापूर : काँग्रेसची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पुढाकार घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापसातील मतभेद मिटवाल तर निवडणूक जिंकणे शक्य आहे, असा निर्वाणीचा इशारा देत निवडणुकीबाबत धोरण कसे राहील, याविषयी कार्यकर्त्यांना शिंदे यांनी कानमंत्र दिला. जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सोलापूर मध्य व दक्षिण सोलापूर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सुशीलकुमार शिंदे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. मोजक्याच कार्यकर्त्यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते. सोलापूर शहर मध्यच्या बैठकीसाठी आ. प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, महिला अध्यक्ष प्रा. ज्योती वाघमारे, प्रदेश निरीक्षक सुधीर खरटमल, महापौर अलका राठोड, अॅड. यू. एन. बेरिया, स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री यांच्यासह नगरसेवक, काँग्रेसचे शहर पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर दक्षिणसाठी शहर व ग्रामीण अशा बैठका झाल्या. या बैठकीला आ. दिलीप माने, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, इंदुमती अलगोंड-पाटील, अशोक देवकते, प्रवीण देशपांडे, गुरुसिद्ध म्हेत्रे, भीमाशंकर जमादार, अल्लाउद्दीन शेख, शिवयोगी बिराजदार तर शहरच्या बैठकीला हद्दवाढ भागातील नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत शिंदे यांनी मतदारसंघातील स्थितीचा उपस्थितांकडून कानोसा घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या कारणमीमांसेकडे दुर्लक्ष करीत विधानसभेची व्यूहरचना करण्यावर भर दिला. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. सामान्य माणसांच्या मनात केंद्र सरकारविरोधात चीड निर्माण झाली आहे. याकडे सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष वेधले.
मतभेद सोडा, एकदिलाने काम करा
By admin | Published: July 13, 2014 1:24 AM