पंढरपूर : 'भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांना माफी मिळणार नाही. तो विषय सोडून बोला, असे आपण माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांना स्पष्टपणे सांगितले,' अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
यात्री निवाससह बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पंढरपूर येथे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे रावते म्हणाले, संपूर्ण देश सैनिकांचा सन्मान करतो. परंतु आ. प्रशांत परिचारक यांनी सैनिकाविषयी विषयी अपशब्द काढले होते. ते कधीही सहन केले जाणार नाही. शिवसेनेच्या आमदाराने जरी असे केले असते, तरी माझी भूमिका तीच असली असती. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर या निलंबनाबाबत चर्चा केली आहे. त्यांनी देखील सैनिकाचा अवमान करणाऱ्याला माफी देता येणार नाही, असे सांगितले आहे.
सभागृहात माझ्याकडून सभापतींचा अवमान झाला होता. सभापतींचा अवमान करण्याची माझी इच्छा नव्हती. यामुळे सभापतींचा माफी मागितली. एस. टी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक हे मला भेटण्यासाठी आले होते. त्यांना मी आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाविषयी चर्चा करायची नाही, असेही स्पष्टपणे सांगितले आहे, असे रावते यांनी सांगितले.