सोलापूर : लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाची उणीदुणी न काढता गट-तट विसरून काँग्रेसी सत्ता कायम ठेवण्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागले पाहिजे. येणारी विधानसभा आपल्यासाठी जबरदस्त युद्ध आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस भवन येथे बोलावण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप माने, आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार, सभागृह नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, धर्मा भोसले, विश्वनाथ चाकोते, महिला आघाडी अध्यक्ष ज्योती वाघमारे, साधना उगले, अशोक कलशेट्टी, माजी खासदार धर्मण्णा सादूल, सुमन जाधव आदी ज्येष्ठ नेते, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, मी निवडून येणार या विश्वासावर कार्यकर्ते घराबाहेर पडले नाहीत. घराघरांत जो संपर्क साधायला हवा होता तो साधता आला नाही; मात्र या सर्व गोष्टींची उणीदुणी काढत बसण्यात आता अर्थ नाही. एकेकाळी इंदिरा गांधी यांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. त्या डगमगल्या नाहीत, त्यामुळे माझ्या पराभवाची चर्चा करू नका, झाले गेले विसरून जावा. पराभव झाला म्हणून घाबरू नका, अजूनही वेळ गेली नाही. सर्वांनी मनात आणले तर मी आता पराभव बघणार नाही. सोलापूर हे माझे गाव आहे, त्याला सोडून मी कधीही जाणार नाही. सहकारी रागाच्या भरात काही बोलतात तसे करू नका, एकमेकांतील मतभेद विसरून एकत्र या. काँग्रेस ही आठरा पगड समाजाला एकत्र करून देश चालवते. काँग्रेस प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे. येणारी विधानसभा म्हणजे जबरदस्त युद्ध आहे, या निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागले पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी केले. गेल्या ४० वर्षांच्या राजकारणात मला खूप काही बघायला मिळाले आहे. जय-पराजय या गोष्टी चालत राहणार आहेत. आता खऱ्या अर्थाने काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळींनी थोडे बाजूला झाले पाहिजे. तरुणांना संधी द्या, त्यांना मार्गदर्शन करा. पदे कुणाला मिळतात कुणाला नाही, त्यावर नाराज होऊ नका. मी आता शांत बसणार नाही, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो आहे, तुम्हीसुद्धा याच पद्धतीने काम करा, असेही यावेळी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. --------------सोशल मीडियाचा गैरवापरसध्या इंटरनेटच्या माध्यमातून वाढणारा सोशल मीडियाचा वापर चुकीच्या कामासाठी केला जात आहे. महापुरुषांचे विद्रुपीकरण करून सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत. भारत सरकारने या व्हॉट्स अप, इंटरनेटवर बंदी घातली पाहिजे, असे यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले. ----------------विकासकामे पोहचवाकाँग्रेस सरकारने जनतेच्या हितासाठी अन्नसुरक्षा योजना, राजीव गांधी आरोग्य योजना यासारख्या अनेक योजना सुरू केल्या होत्या; मात्र त्या तळागाळापर्यंत म्हणाव्या तशा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे यंदा काँग्रेसला अपयश आले आहे, अशी खंतही यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा, असे ते म्हणाले.
विधानसभा म्हणजे जबरदस्त युद्ध !
By admin | Published: June 22, 2014 12:53 AM