सोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील बंगल्याबाबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी लक्षवेधी केली आहे. त्यामुळे शासनाकडून या बंगल्याबाबत माहिती मागविल्यामुळे महापालिकेत धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्याबरोबरच विधानपरिषदेचे सदस्य संजय दत्त, शरद रणपिसे, अशोक जगताप, हुस्नबानू खलिफे, अनिकेत तटकरे, सुनील तटकरे, हेमंत टकले, अमरसिंह पंडित, संदीप चव्हाण, किरण पावस्कर, अॅड. राहुल नार्वेकर व इतर सदस्यांनीही या प्रश्नावर लक्षवेधी केली आहे.
सहकार मंत्र्यांनी अग्निशामक दलास आरक्षित असलेली जागा खरेदी करून बांधलेल्या अलिशान बंगल्याचा बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयात दिला आहे. यामुळे सहकार मंत्र्यांचा बंगला बेकायदेशीर असल्याचे उजेडात आले आहे. ही बाब गंभीर आहे. बंगल्याची जागा गुंठेवारीची असून, त्यावर अद्याप आरक्षण आहे. गुंठेवारी जागेवर बांधकाम परवाना देण्याची तरतूद नसताना महापालिकेच्या तत्कालीन अधिकाºयांनी असा परवाना दिला. यापुढे जाऊन बांधकाम परवाना रिवाईज करण्याचा अर्ज आलेला नसताना महापालिकेच्या अधिकाºयांनी हा परवाना रिवाईज केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर हे बांधकाम त्वरित निष्कासित का केले नाही. सहकार मंत्र्यांनी पदाचा दुरूपयोग केल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तरीही शासनाने या प्रकाराकडे का दुर्लक्ष केले, असा सवाल लक्षवेधीद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नगरअभियंता कार्यालयात धावपळ उडाली आहे.
बसथांबा गेला कुठेच्विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी मांडलेल्या लक्षवेधीमध्ये सहकार मंत्र्यांच्या बंगल्याबरोबर इतर दहा जागांबाबतची माहिती विचारली आहे. सहकार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर बसथांबा होता. बंगला बांधल्यावर हा बसथांबा व रस्ते विकास महामंडळाने बांधलेला पदपाथ कोणी हडप केला, असा सवाल उपस्थित केला आहे. लक्षवेधीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे जमा करण्यात येत आहेत. या फायली ६ जुलैपर्यंत नागपूरला रवाना करण्यात येणार आहेत.