राकेश कदम
सोलापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेचे सभागृह नेतेपद मिळावे, यासाठी भाजपच्या नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेला साथ हवी असेल तर तत्काळ निर्णय घ्या, आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा नागेश वल्याळ, शिवानंद पाटील, श्रीनिवास करली यांच्यासह पद्मशाली समाजातील काही आजी-माजी नगरसेवकांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दिला आहे.
स्थायी समिती सभापतीपदाचा वाद सर्वाेच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आर्थिक विषयांवरील सर्व महत्त्वाची प्रकरणे महापौर आणि सभागृहनेते यांच्या संमतीने मार्गी लागतात. त्यातील ‘हिस्सा’ दोघांच्या वाट्याला येत असल्याचे सांगितले जाते. महापौर, उपमहापौर निवड पुढील तीन महिन्यांनी होणार आहे. विद्यमान सभागृहनेते संजय कोळी यांची मुदत संपली आहे. परंतु, पालकमंत्री देशमुख यांनी कोळी यांना मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील बडे नगरसेवक हवालदिल झाले आहेत.
सहकारमंत्री गटाचे शिलेदार नगरसेवक नागेश वल्याळ यांनी अलीकडच्या काळात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी सलगी केली आहे. आपणास सभागृह नेतेपद द्या, मी गटातटाचे काम न करता पक्षाचा नावलौकिक होईल, असे काम करून दाखवितो. जून महिन्यात याबाबत तातडीने निर्णय घ्या, असे त्यांनी देशमुखांना सांगितले आहे. नगरसेवक शिवानंद पाटील यांची पालकमंत्री देशमुख यांच्यावरील नाराजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. पाटील यांना प्रथम स्थायी समिती, नंतर बाजार समितीच्या स्वीकृत संचालकपदाचे आश्वासन देण्यात आले. पण हाती काहीच लागले नाही. पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा विधानसभेला उत्साह राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पद्मशाली समाजातील पदाधिकाºयांनी घेतली बैठक - नगरसेवक श्रीनिवास करली आणि परिवहन सदस्य अशोक यनगंट्टी यांनी गुरुवारी सायंकाळी मार्कंडेय मंदिरात पद्मशाली समाजातील आजी-माजी पदाधिकाºयांची बैठक घेतली होती. करली सभागृह नेतेपदासाठी इच्छुक आहेत. या बैठकीनंतर करली म्हणाले, गेली ३४ वर्षे पद्मशाली समाजातील नगरसेवकांना महापौर, स्थायी समिती, सभागृहनेता या पदांपासून दूर ठेवले जात आहे. लोकसभा निवडणुकीत हा समाज भाजपच्या पाठीशी राहिला. वरिष्ठांनी वारंवार दुर्लक्ष करणे बरे नाही. येत्या चार दिवसांत समाजाची आणखी मोठी बैठक होईल. यावेळी नगरसेविका श्रीकांचना यन्नम, अनिता कोंडी, अविनाश बोमड्याल, विजयालक्ष्मी वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल, आनंद बिर्रु, मधुकर वडनाल, रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिड्डी आदी उपस्थित होते.
मुदत संपली त्यांना बदलणार : देशमुख - पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुुरुवारी परिवहनच्या प्रश्नावर बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महापौर, उपमहापौर आणि सभागृहनेता यांच्यासह ज्यांची मुदत संपली आहे त्या जागी नव्या पदाधिकाºयांची निवड करण्यात आली. मनपाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नव्या पदाधिकाºयांबाबत निर्णय होईल.
आमचे विद्यमान पदाधिकारी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करीत नाहीत. चांगले काम करणाºयांवर नेहमी अन्याय होतो. लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना शहर उत्तरच्या तोडीस तोड मताधिक्य मध्य विधानसभा मतदारसंघातून मिळाले. ही गोष्ट विचारात घ्यावीच लागेल. सभागृह नेतेपदावर माझा दावा आहे. वरिष्ठांनी लवकर निर्णय घ्यावा. - शिवानंद पाटील, नगरसेवक, भाजप.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे सभागृह नेतेपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तत्पूर्वी संधी मिळाल्यास आणखी जोमाने काम करता येईल. पक्षातील नेते यावर तत्काळ निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. - नागेश वल्याळ, नगरसेवक, भाजप.