दैनंदिन जीवनात आपण आपल्या जबाबदाºया पार पाडत असतो. पण एक सैनिक म्हणून देशसेवा करताना मला प्रचंड अभिमान वाटतो. निस्सीम, नि:स्वार्थीपणे देशवासीयांसाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे आपण देतो. देशाचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला मान असतो. भाषा, धर्म, जात, पंथ, प्रांत हे काही माहिती नसते. आपण सगळे भारतीय आहोत, हेच सैनिक म्हणून माहिती असते.
आमचे कुटुंब सैनिकी वारसा लाभलेले. माझे वडील स्व. लक्ष्मण आगावणे यांनी १९६२, ६५ व ७१ च्या युद्धात भाग घेतला. विपरीत परिस्थितीत नामोहरम करून मिळालेली पदके प्रेरणा देतात. मी स्वत:ही श्रीलंकेत शांती सेनेचा (आयपीकेएफ) हिस्सा होतो. आॅपरेशन पवन, आॅपरेशन रक्षक, पंजाबमध्ये उग्रवाद शिखरावर असताना तिथे केलेली सेवा आणि नंतर बेअंत सिंग यांचे स्थापन झालेले सरकार ही केलेल्या कामाची निष्पत्ती होती. जम्मू-काश्मीरसह देशाच्या विविध भागात राजस्थान, पंजाब, सिक्कीम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्टÑ, तामिळनाडू या राज्यात सैनिकी सेवा बजावण्याचे भाग्य लाभले. जम्मू-काश्मीरमध्ये काम करताना त्यावेळच्या फारुख अब्दुल्ला सरकारने उत्कृष्ट सेवेबद्दल केलेला गौरव ही माझी कामगिरी आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
सैनिक होण्याची खुमखुमी कायम होती. अशातच १९८५ साली मी सैन्यात दाखल झालो. सैन्यात असताना पदवी, स्वास्थ्य निरीक्षक डिप्लोमा, संगणक यांची पदवी मिळविली. पत्रकारितेची पदवी मिळविता आली नाही, ही खंत माझ्या मनाला आहे. सैनिक म्हणून काम करताना भारताच्या अनेक भागात फिरता आले. भारतामधील सर्व प्रांतातील लोक या ठिकाणी एकत्र येतात. ज्या ट्रेडमधून तुमची निवड झाली, त्याच ट्रेडमध्ये शेवटपर्यंत काम करायचे. या ठिकाणी तुमची जात, धर्म पाहिले जात नाही. एखाद्याने स्वयंपाकी म्हणून अर्ज केला असेल तर त्याला त्याच क्षेत्रात काम करावे लागते. त्याचे प्रशिक्षणही दिले जाते. इतर कोणत्याही कारणाने ते काम नाकारता येत नाही. सैनिकी संस्था म्हणजे अगदी बारा बलुतेदारांप्रमाणे. समाजाने केलेल्या सर्वच वर्गातील लोकांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. सफाई कामापासून उच्चपदस्थ कमांडरपर्यंत आपापल्या जबाबदाºया पार पाडत असतात. देशातील सर्वोच्च आणि सुरक्षिततेची जबाबदारी असणारी संस्था (सैन्यदल, नौदल, वायुदल) ही कोणत्याही जात, धर्म, पंथाविना चालते. विविधतेतून एकता हे सैन्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एकात्मतेचे सुंदर उदाहरण म्हणजे सैनिक.
वयाच्या ४१ व्या वर्षी मी सेवानिवृत्त झालो. पुणे महापालिका, जि़प़ पुणे येथे आरोग्य निरीक्षक म्हणून निवड झाली. सैन्यदलातील अनुभव पाठीशी होता. तो सामान्य जनतेच्या उपयोगी पडणार होता. पगार आणि सोयीसुविधांचा विचार न करता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचे ठरवून जि़प त आलो. सेवानिवृत्तीनंतर ज्यावेळी सामान्यांमध्ये आलो त्यावेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जाती-धर्मावरून होणारे वादविवाद, राजकारण, समाजकारण, अर्थकारण. हे विचार आकलनाच्या पलीकडचे आहेत. आपण आपल्याच माणसाच्या जीवावर उठलोय, याचे भान देखील काहींना नाही. यामुळे देशाचे किती नुकसान होते आहे, याचा मागमूसही या लोकांना नाही.
ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज, छ. शाहू, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा टिळक-आगरकर असतील या सर्वांनी कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता समाजप्रबोधनाचे काम केले. यांनी दिलेली जात-धर्मविरहित विचारांची संकल्पना पुढे नेणे आवश्यक आहे. आपण जात-धर्मविरहित समाजाची संकल्पना का मांडू शकत नाही, हा खरा सवाल आहे. साक्षरता, शिक्षण यातून सुशिक्षित समाज निर्माण होऊन सामाजिक समता, बंधुता वाढीस लागावी अशी अपेक्षा होती. आता आपणच ठरवायचे आहे, आपण कुठे आहोत? देशासाठी काय करणे गरजेचे आहे? कोणताही भेदभाव नसणारा समाज निर्माण झाल्यास आरक्षणाची गरजच लागणार नाही. सगळ्या गोष्टी गुणवत्तेवर असतील. असा समाज मी सैन्यात पाहिला आहे, म्हणून अशी तळमळ निर्माण होणे गरजेचे आहे. - सूर्यकांत आगवणे (लेखक हे माजी सैनिक आहेत)