सोलापूर : ९० वर्षांची आजी पॉझीटीव्ह आली. लेकीने नाकारलं. ऑक्सिजन लेव्हल कमी झाली, बेड मिळेना म्हणून ती रस्त्यावर फिरत होती. शेजारणींना तिची दया आली अन् त्यांनी डॉक्टरांना संपर्क साधला. सोलापुरात बेड मिळाला अन् १४ दिवसांच्या उपचारानंतर ती खडखडीत बरी झाली म्हणून शेजारणींनी फुलं टाकून स्वागत केले. ही कहाणी आहे माढा तालुक्यातील भीमानगरातील.
शकुंतला काशीद यांना २ मे रोजी त्रास होऊ लागला. त्यामुळे आरोग्य केंद्रात तपासणी केल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तातडीने ऑक्सिजन असलेल्या दवाखान्यात ॲडमिट व्हा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. आजीने लेकीला कळविले. पण ती आलीच नाही. त्यामुळे ती फिरत राहिली. शेवटी कुठेच दवाखान्यात बेड उपलब्ध न झाल्याने ती घरी परतली पण लेकीने तिला घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या गावात रस्त्यावर बसून होत्या.
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील, विमल गायकवाड, राणी भास्कर यांनी त्यांची चौकशी केली व त्यांनी सरपंच व ग्रामसेवक एल. एम. शेख, डॉ. थोरात यांच्याशी संपर्क साधला. सर्वजण तेथे तातडीने दाखल झाले. चौकशी केली तरी ऑक्सिजन बेड मिळेना. पाटील यांनी जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या डॉ. सुमित्रा तांबारे यांना संपर्क करून विनंती केली. त्यावर त्यांनी आजीला छत्रपती शिवाजी महाराज सर्वेापचार रुग्णालयाकडे पाठविण्याचा सल्ला दिला. ॲम्बुलन्समधून आजीला तेथे नेल्यावर बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. डॉ. तांबारे यांनी विमा रुग्णालयात आजीला उपचारास दाखल केले. १४ दिवस उपचार घेतल्यानंतर आजी खडखडीत बरी झाली.
आजीने बरी झाल्याचा निरोप दिल्यावर पाटील यांनी गाडी पाठवून गावाकडे नेले. ९० वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केल्याबद्दल उपस्थित शेजारणींनी फुले उधळून तिचे स्वागत केले. तिला नवीन साडी चोळी दिली. लेक व भावाची समजूत घातली; पण कोणीही तिचे पालकत्व स्वीकारण्यास तयार न झाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने शाळेत अलगीकरणात तिची सोय करण्यात आली आहे.
डॉक्टर म्हणाले आजीचे धैर्य
ऑक्सिजन कमी झालेले त्यात बेड मिळेना म्हणून सरपंचासह सगळेजण चिंतीत होते. गटविकास अधिकारी संताजी पाटील यांनीही आजीच्या उपचारासाठी प्रयत्न केले. सोलापुरात रुग्णालयात दाखल झाल्यावर ही मंडळीच आजीच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांकडे चौकशी करत होती. उपचार करणारे डॅाक्टर म्हणाले, आजीकडे धैर्य असल्याने तिने कोरोनावर मात केली. आज ही बाब सर्वांना सांगणे महत्त्वाचे आहे. कोरोना झाला तरी घाबरू नका. वेळेत उपचार केल्यास आजार बरा होतो, असे डॉ. थोरात म्हणाले.