येथील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धाराम हंद्राळमठ यांच्या पत्नी सुवर्णा यांना दहा दिवसांच्या उपचारानंतर लवकरच डिस्चार्ज मिळेल या आशेवर असताना मुलीच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. मूळचे नागणसूर गावचे वकील हंद्राळमठ यांनी व्यवसायासाठी काही वर्षांपूर्वी अक्कलकोट येथील खासबागचे रहिवासी झाले होते. त्यांना अजितकुमार आणि श्रीदेवी असे "हम दो, हमारे दो" असा सुखी संसार सुरू होता.
सुवर्णा यांना सोलापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारांकरिता दाखल करण्यात आले होते. उपचाराला दहा दिवस चांगला प्रतिसाद दिला. तब्येतीत सुधारणा होत असल्यामुळे दोन दिवसांत डिस्चार्ज मिळेल या आशेने संपूर्ण कुटुंब खुशीत होते. मात्र, अचानकपणे मृत्यूची बातमी ऐकून दुःख अनावर झालेले पती काही वेळ बेशुद्ध झाले होते.
वकील सिद्धाराम आपल्या व्यवसायात व्यस्त असत. यामुळे सुवर्णा यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन मुलांना उच्च शिक्षण दिले. अजितकुमार कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. दुसरी मुलगी श्रीदेवी मुंबई येथे एका कंपनीत इंजिनिअर म्हणून नुकतीच लागली होती. अवेळी दुर्दैवी मृत्यू आल्याने संपूर्ण कुटुंब हतबल झाले आहे.
---
कुटुंब झाले पोरके
मुलगी श्रीदेवी ही उच्च शिक्षित असल्याने मुंबई येथे एका कंपनीत नुकतीच कामास लागली होती. तिच्या तोडीचा जोडीदार शोधून लग्न जमविले होते. कोरोनातून लवकरच बरे होऊन मुलीचे थाटात लग्न पार पाडण्याच्या घाईत असणाऱ्या सुवर्णा यांनी लग्नपत्रिका, कपड्याचे बस्ता, सर्व काही तयारी पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या.पण नियतीने त्यांना त्यापूर्वीच घेऊन गेल्याने संपूर्ण कुटुंब पोरके झाले आहे.
---
फोटो: ११ सुवर्णा