उडगी : सलग दोन वर्षांपासून लॉकडाऊन असल्याने अक्कलकोट तालुक्यातील लिंबू उत्पादक प्रचंड प्रमाणात लाखोंचा फटका सहन करीत आहेत. ८० ते १०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकणारा लिंबू सद्यस्थितीत १ ते २ प्रति किलो रुपये दराने विकला जातोय.
बळीराजाला नेहमी या ना त्या कारणामुळे सतत येणाऱ्या संकटांशी सामना करावा लागतोय. सध्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहेत. गावागावांतील आठवडी बाजार बंद आहेत. यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसह किरकोळ विक्रेते अडचणीत आले आहेत.
दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महन्यात उन्हाचा तडाखा असतो. त्यामुळे या काळात लिंबाचे दर वाढतात; पण कोरोनाच्या तडाख्यात लिंबू व्यापारीसुद्धा सापडला आहे.
---
अक्कलकोट तालुक्यात एकूण लिंबूचे क्षेत्र ४८५ हेक्टर आहे. त्यापैकी तडवळ भागात ३३५ हेक्टर आहे. गौडगाव, शावळ, करजगी, आंदेवाडी, नाविंदगी, हिळ्ळी, सातनदुधनी, उडगी, गळोरगी आदी गावांत लिंबूचे उत्पादन घेतले जाते. सन २०२०-२१ वर्षात तालुक्यात ९१ शेतकऱ्यांनी ६० हेक्टर क्षेत्रावर लिंबूची ‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी’ योजनेतून लागवड केली आहे.
---
अक्कलकोट तालुक्यात लिंबाचे क्षेत्र मोठे आहे; परंतु बाजारात अचानक भाव कमी होतात. त्यावेळी लिंबूपासून प्रक्रिया करून लिंबू सरबत, लिंबू पावडर तयार केल्यास शेतकऱ्यांना एक प्रकारे चालना मिळेल; कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एखाद्या गटाने पुढाकार घेऊन प्रक्रियायुक्त उद्योग सुरू करावे. नवीन लागवड करण्यासाठी कृषी विभागामार्फत पूर्ण सहकार्य केले जाईल.
-सूर्यकांत वडखेलकर
तालुका कृषी अधिकारी, अक्कलकोट
----
यंदा भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने झाडांना बहर आल्याने उत्पादन चांगले होणार अशी आशा होती. परंतु लॉकडाऊन असल्याने मजूर, वाहतूक खर्चपण निघत नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
- रमेश अळगी
लिंबू उत्पादक, गळोरगी
--
फोटो : १९ उडगी
लिंबूची आवक मोठ्या प्रमाणात असून अक्कलकोट स्टेशन परिसरातील बाजार पेठेतील दृश्य.