सोलापूर : मनाने खंबीर असलेले डॉ. शिरीष वळसंगकर असे कसे स्वतःचे जीवन संपवतील, गेल्या तीन महिन्यांत त्यांच्या जीवनात असे कोणते वादळ आले. डॉक्टरांचा एका विश्वासू सेवक सत्यवानने (नाव बदलले आहे) सारे सांगितले, डॉ. वळसंगकर यांना हॉस्पिटलमध्ये जे जे चालले होते, त्याचा वैताग आला होता. त्यांनी स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली, तेव्हा महत्त्वाकांक्षी असलेली मनीषा त्रस्त झाली. तिने काळ्या विद्येचाही प्रयोग सुरू केला. बिब्बा, लिंबू अन् काळ्या बाहुल्या ती रुग्णालयातील वेगवेगळ्या भागात ठेवू लागली, असा दावा या सेवकाकडून करण्यात आला आहे.
डॉ. वळसंगकर यांनी सन २०१७पासूनच सर्व कारभार आपला मुलगा अन् सुनेकडे दिला होता. त्या काळात मनीषाने मनमानी सुरू केली. एमआरआय फिल्म खरेदीत पैसे लाटू लागली. परस्पर भंगार विकू लागली. रुग्णांच्या बिलात गाळा मारू लागली. तिच्याबद्दल कोणी तक्रार केली की, मनीषा त्या कर्मचाऱ्याला काढून टाकायला भाग पाडायची. यातूनच या सत्यवानलाही काढून टाकले होते. सत्यवान आणखी बोलता झाला. त्या बाईची कारस्थाने मी डॉक्टरांना सांगायचो. नेहमी भेट घ्यायचो; पण सतत त्या बाईबद्दल ऐकून डॉक्टर वैतागून गेले होते. म्हणायचे तिच्याबद्दल काही सांगू नको. तू बस निवांत. गप्पा मारू; पण एक दिवस डॉक्टरांनी ठरवले अन् गेल्या तीन महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी सर्व कारभार आपल्या हाती घेतला. बाईचा जळफळाट झाला. लोकांना दम भरू लागली, हा डॉक्टर सहा महिन्यांत मरणार आहे. मग मीच आहे अधिकारपदाच्या खुर्चीवर.
रिक्षातून जायची, लिंबू, बिब्बा आणायचीअमावास्येच्या दिवशी मनीषा ही ऑन ड्यूटीच अचानक रिक्षामधून जायची. कुठे जायची हे ठाऊक नाही; पण येताना लिंबू, बिब्बा अन् काळ्या बाहुल्या घेऊन यायची. त्या साऱ्या दवाखान्यात ठेवून जायची. एक मशीन बसवतानाही तिने खाली या वस्तू ठेवल्याचे सत्यवानने सांगितले.
टीव्हीचा आवाज वाढवला!डॉक्टरांनी आणि मॅडमनी त्या बाईला गुरुवारी केबिनमध्ये बोलावून घेतले होते. सत्यवान म्हणाला, त्यावेळी मला डॉक्टरांनी जायला सांगितले. तिथे काय झाले ठाऊक नाही; पण आत्महत्येच्या दिवशी सहा वाजता डॉक्टरांना मला भेटता आले नाही. नळाला पाणी येण्याचा दिवस असल्याने मी येत नसल्याचे कळविले; पण कधीही मोठा आवाज सहन न करणारे डॉक्टर... रात्री ८:३० वाजता त्यांनी टीव्हीवरील आयपीएल मॅचचा आवाज मोठा लावला अन् बाथरूममध्ये जाऊन स्वतःवर फायर करून घेतले.
अधिकार काढून टाकलेडॉक्टर जसे जसे हॉस्पिटलमध्ये यायला लागले. तशी त्यांची बैठकही वाढली. तो सेवक म्हणाला, डॉक्टरांनी मलाही हॉस्पिटलमध्ये येऊन दोन तास बसायला सांगितले. सत्यवान म्हणाला की, हे त्या बाईला आवडले नाही; पण माझे येणे चालूच होते. डॉक्टरांना मनीषाचे सारेच समजले तेव्हा तिचे अधिकार काढून टाकले. तिला हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर न बसता फिरून काम करायला सांगितले. बाई आणखीच संतापली.