पंढरपूर : तालुक्यातील वाखरी येथे बिबट्याने पुन्हा एकदा पाळीव जनावरांची शिकार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना प्रत्यक्ष एका महिलेने पाहिल्याने वाखरी परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाखरी येथील ओढ्यामध्ये एकाला ११ नोव्हेंबर रोजी बिबट्या दिसला होता. ही खबर वनविभागाच्या अधिकाºयांना कळविल्यानंतर तो बिबट्या नसेल असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी लावला होता. परंतु १२ नोव्हेंबरला पहाटे बिबट्याने वाखरी-गादेगाव रस्त्यावरील लक्ष्मणदास महाराज यांच्या मठाजवळ एका गायीची शिकार केली़ त्यानंतर १३ नोव्हेंबरला पहाटे बिबट्याने ती शिकार पळविली होती.
या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाºयांना जाग आली़ त्यांनी वाखरी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी चार पिंजरे लावले़ पुन्हा आणखीन दोन दिवसांनी राऊत मळा येथील एका युवकाला बिबट्या दिसून आला़ मात्र, त्यानंतर या परिसरात पुन्हा शिकार न झाल्याने तो निघून गेल्याचा अंदाज ग्रामस्थ व वनविभागाच्या अधिकाºयांनी लावला़ परंतु २१ रोजी पुन्हा दिवसाच बिबट्याने शिकार करण्याचा प्रयत्न केला आणि ही घटना त्या परिसरातील एका महिलेने पाहिली. याबाबतची माहिती वनविभागाला कळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पोवळे, वनपाल सुभाष बुरुंगले, वनरक्षक एस़ कळसाईत, श्रीशैल पाटील हे घटनास्थळी पोहोचले. पुन्हा त्या ठिकाणी असलेल्या बिबट्याच्या पाऊलखुणा पाहिल्या. जखमी शेळीचीही पाहणी केली. यावेळी त्या महिलेने बिबट्यासह आणखी एक लहान आकाराचा बिबट्या असल्याचे सांगितले़
अहवालात बिबट्याचीच विष्ठा असल्याचे सिद्ध- वाखरी परिसरात प्राण्याची आढळलेली विष्ठा ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. ती विष्ठा बिबट्यासदृश प्राण्याची असल्याचा अहवाल आला आहे. बुधवारी दुपारी वाखरी परिसरात त्या प्राण्याने आणखी एक शिकार केली. याबाबतची चौकशी केली जाईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल पोवळे यांनी सांगितले़
मी घरामध्ये जेवण करत होते. अचानक शेळ्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. बाहेर आले तर बिबट्या व त्यासह आणखी एक लहान आकाराचा बिबट्या दिसला़ ते शेळीवर हल्ला करत होते़, मी हुसकावण्याचा प्रयत्न केला असता तेच माझ्या दिशेने आले, त्यामुळे मी जोरजोराने ओरडले, त्यानंतर ते बाजूच्या शेतात पळून गेले. - रत्नप्रभा भारत पांढरे,महिला ग्रामस्थ वाखरी