सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील रोपळे रोडवरील वस्तीवर राहणाऱ्या पती-पत्नीवर बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजता सुमारास घडली. रामेश्वर पाटील असे त्यांचे नाव असून बिबट्या सदृश्य प्राण्याने त्यांच्या नाकाचा चावा घेतला आहे.
पंढरपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्या सदृश्य प्राणी वावरत आहे. या बिबट्या सदृश्य प्राण्याने आतापर्यंत वस्तीवरील गाय, म्हैस, शेळी यांच्यावर हल्ला केला होता, मात्र शुक्रवारी पहाटे वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यावरच हल्ला केला आहे. यावेळी एक मोठा बिबट्या सदृश्य प्राणी आणि त्याची दोन पिल्ले होती. पैकी एका लहान पिल्याने हल्ला केल्याचे समजते.
सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी अनेक जण गाव सोडून वस्तीवर राहणे पसंत करीत आहेत. परंतु अशा प्राण्यांच्या हल्ल्यामुळे वस्तीवर राहणेसुद्धा असुरक्षित झाले आहे. या घटनेमुळे तुंगत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. जखमी रामेश्वर पाटील यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.