सोलापूर - जिल्ह्यातील उंदरगावमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. मागील दोन महिन्यांपासून उंदरगाव परिसरात बिबट्या ग्रामस्थांना दिसत होता. त्यामुळेच ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन शेतात आणि गावात वावरत होते. बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर उंदरगाव ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ग्रामस्थांनी बिबट्याने गावातील अनेक शेळ्या व मेंढ्या पळवल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र वनविभागाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. अखेर ग्रामस्थ आक्रमक झाल्यावर वनविभागाने गावात पिंजरा लावला. त्यानंतर रविवारी सकाळी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. गावात आणखी एक मादी बिबट्या आणि तिची 2 पिल्लं असल्याचं अनेक ग्रामस्थांनी पाहिल्यामुळे त्यांनाही पकडण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.