कोल्हापूर : रुईकर कॉलनी परिसरात आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागासह कोणत्याच यंत्रणेकडे काहीच साधने नव्हती. त्यात गर्दी व गोंधळामुळे बिथरलेल्या बिबट्याला पकडणे मोठे आव्हान होते. मात्र विक्रमनगर, सदर बझारमधील काही तरुण आणि माकडवाला वसाहतीतील कुचीकोरवी समाजाच्या धाडसी तरुणांनी जाळीसह झडप घालून त्याला पकडले. कोणत्याही हत्याराविना बिबट्याला जेरबंद केले. नेहमी डुकरांना पकडताना जशी रणनीती अवलंबतात, त्याच पद्धतीने त्यांनी बिबट्या पकडला. त्याला दांडक्यांच्या साहाय्याने जोर लावून जखडून ठेवले होते. वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे प्राप्त परिस्थितीत दुसरा पर्यायही कोणता नव्हता. हजारोंच्या गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते. त्यातच युवकांना बिबट्याचा फोटो काढण्याची घाई झाली होती. या गर्दीने गोंधळ उडविला. मात्र या परिसरातीलच सलमान बागवान, कुचीकोरवी समाजातील रवी माने, उमेश माने, महेश माने, विजय माने, अजिज गवंडी, दीपक माकडवाले, भास्कर कोरवी, रवी माने, उमेश जोंधळी यांनी रणनीती आखून बिबट्या पकडला. विशेष म्हणजे कोणतेही हत्यार त्यांच्याकडे नव्हते. केवळ जाळी व काठीच्या साहाय्याने बिथरलेला बिबट्या त्यांनी पकडला. फायर ब्रिगेड, वनविभाग, पोलीस यंत्रणेचे सहकार्य लाभले. नववर्षाच्या शुभेच्छा द्यायला जेव्हा बिबट्या येतो...धैर्याने केला सामना : महाडिक, देशपांडे कुटुंबीयांनी व्यक्त केला थरारक अनुभवकोल्हापूर : रुईकर कॉलनी म्हणजे उच्चभ्रू नागरिकांचा परिसर. आज सकाळी येथील काही नागरिक वॉकला निघालेले, काही मैदानात व्यायाम करताहेत, महापालिकेचे सफाई कामगार झाडलोट करताहेत, घराघरांत लगबग सुरू आहे... तेवढ्यात बांधकाम कामगारांनी बिबट्या पाहिला आणि एकच गोंधळ सुरू झाला. बिथरलेला बिबट्या कधी खासदार धनंजय महाडिक यांच्या बंगल्याच्या आवारात, तर कधी शेजारी अरविंद देशपांडे यांच्या लॉनवर उड्या मारत होता. तब्बल साडेचार तास सुरू असलेला हा थरार अनुभवताना नव्या वर्षात बिबट्या जणू सगळ््यांना शुभेच्छाच द्यायला आला होता. मोठा मुलगा गावाला जाणार म्हणून अरुंधती महाडिक यांची स्वयंपाकघरात लगबग सुरू होती. खासदार धनंजय महाडिकदेखील घरीच होते. तेवढ्यात मागच्या पोर्चमधील कुत्री जोरजोराने भुंकायला लागली. काही जणांनी खासदार महाडिक यांना तुमच्या घरात बिबट्या शिरलाय, असे सांगितल्यानंतर पहिल्यांदा त्यांना हे मजेतच सांगताहेत असे वाटले. बाहेर गोंधळ सुरू झाल्यावर त्यांनी तातडीने वनखाते, पोलिसांना फोन केले. देशपांडे यांच्या घराच्या मागच्या बाजूला मोठे दार आणि काचेच्या खिडक्या आहेत, झोपाळा आहे. नशिबाने आज दरवाजा बंद होता, कारण नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पन्हाळ््याला गेलेले देशपांडे कुटुंबीय रात्री दीड वाजता घरी परतले. सकाळी उठल्या-उठल्या रमा यांनी आपल्या कंपौंडमध्ये बिबट्या पाहिला. अरुंधती महाडिक म्हणाल्या, बिथरलेला बिबट्या कधी खासदार महाडिक यांच्या, तर कधी देशपांडे यांच्या बंगल्याच्या आवारात उड्या मारत होता. बाहेर साहेब आणि दोन्ही मुलं असल्याने जीवात जीव नव्हता. खासदार महाडिक म्हणाले, त्या धाडसी मुलांना बिबट्याला पकडता यावे यासाठी शक्य ते सगळे पयत्न करत होतो. गुढी पाडव्यासाठीची काठी मुलांनी आणलेल्या जाळीला बांधली. नागरिकांना परिसरातून हटवताच तेथे पुन्हा बिबट्या आला. एकेक्षणी बिबट्याने आमच्यावर हल्लाच चढविला, पण समोर गाड्या आडव्या लावल्याने वाचलो. खबरदारी म्हणून बंदूक घेतली, पोलीसही गोळी घाला म्हणत होते, पण बिबट्या खरंच खूप देखणा होता आणि एका प्राण्याला मारणे पटले नाही म्हणून काहीही करून त्याला पकडायचेच, असे सांगितले. साडेचार तासांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले, पण खरंच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अनुभवलेला हा थरार मी आयुष्यात कधी विसरणार नाही. बिबट्या जणू नवीन वर्षाच्या शुभेच्छाच द्यायला आला होता.निष्क्रिय वनविभाग बिबट्या आल्याचे कळल्यानंतर मी वनविभागाला फोन केला. हे अधिकारी आणि पोलीस हातात काठ्या घेऊन आले होते, त्यांच्याकडे बिबट्याला पकडण्यासाठीचे एकही साधन नव्हते. प्राण्याला बेशुद्ध करायची बंदूक सांगलीत होती. सगळे अधिकारी हा थरार फक्त पाहत होते. माकडवाला वसाहतीतील धाडसी मुले नसती तर बिबट्याला कधीच पकडता आले नसते. बिबट्याला गाडीत घातल्यावर ती बंदूक घेऊन अधिकारी आला. - धनंजय महाडिक, खासदार कोल्हापूरच्या नागरी वस्तीत तिसऱ्यांदा आला बिबट्याकोल्हापूर : कोल्हापूर परिसरातील जोतिबा, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी ही ठिकाणे बिबट्यांची प्रजोत्पादन व अधिवास असलेली केंद्रे बनत चालली आहेत. एकेकाळी असणाऱ्या निर्जनस्थळांवर नागरिकांचा संचार वाढल्याने आणि भक्ष्यांची उपलब्धता कमी पडू लागल्याने या बिबट्यांनी नागरी वस्तीकडे मोर्चा वळविला असल्याचे प्राणिशास्त्राचे अभ्यासक सांगतात. गेल्या वीस वर्षांतील जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्यांच्या झालेल्या दर्शनामुळे या दाव्याला पुष्टी मिळत आहे. १९९४ मध्ये कसबा बावडा येथे प्रथमच नागरी वस्तीत बिबट्या घुसला. त्यावेळी त्याने केलेल्या हल्ल्यात एक लहान मुलीला प्राण गमवावे लागले होते. मध्यंतरी बोरपाडळे येथेही बिबट्या पकडला गेला होता. त्याच्यावर उपचार करून पाच दिवसांनी त्याला जुन्नर येथे सोडण्यात आले. त्यानंतर आज, गुरुवारी बिबट्याने रूईकर कॉलनी परिसरात आपले दर्शन दिले. वीस वर्षांत दोनवेळा जर बिबट्या नागरी वस्तीत शिरला असला तरी जोतिबा, पन्हाळा, कात्यायनी, बोरपाडळे, गगनबावडा, राधानगरी आदी परिसरात बिबट्याने नागरिकांनी वारंवार दर्शन देऊन आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. विशेषत: जोतिबा डोंगराच्या घळीत असलेली वीजकडा ही बिबट्यांना सुरक्षित जागा आहे तेथेच प्रजोत्पादन व अधिवास केंद्र आहे. बिबट्यांना लपण्याची आणखी एक हक्काची जागा म्हणजे उसाचे मळे आहेत. परंतु ऊस तोडणी सुरू झाल्याने बिबटे बिथरले असण्याची शक्यता आहे तसेच भक्ष आणि भक्षाचे प्रमाण यांचा असमतोल निर्माण झाला असल्यानेही बिबट्यांनी आपली जागा सोडून नागरी वस्तीकडे वळले असण्याची शक्यता आहे. गायकवाड वाड्याची आठवणरुईकर कॉलनीत बिबट्याच्या थरारानंतर कोल्हापूरकरांची पंचगंगा परिसरात जुन्या विवेकानंद कॉलेजजवळील गायकवाड वाड्यातील पाळीव बिबट्याची आठवण जागी झाली. पंचगंगेला आलेला पूर पाहण्यासाठी आईसोबत आलेल्या मुलीवर त्या बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी क्रिकेट खेळत असताना हौशी मुले बिबट्या बघण्यासाठी गेले असता त्यातील एका मुलावर त्याने हल्ला केला होता. काही वर्षांपूर्वी कसबा बावड्यातही बिबट्याने मुलीवर हल्ला करून ठार केले होते. हौशे-नवशे-गवसे आणि यंत्रणा बिबट्या रुईकर कॉलनीत आल्याची वार्ता सोशल मीडियाद्वारे काही क्षणांतच संपूर्ण जिल्ह्यात समजली. त्यामुळे या परिसरात बिबट्याला बघण्यासाठी अगदी जत्रेचे स्वरूप आले होते. प्रत्येकाला बिबट्याला बघायचे होते. त्यामुळे प्रत्येकजण अरविंद देशपांडे यांच्या गजेंद्र बंगल्याकडे धाव घेत होता. अपुरी यंत्रणा असल्याने अबालवृद्धांनी बंगल्यालाच वेढा घातला होता. काळजाचा ठोका चुकला गोंधळामुळे सैरभर झालेल्या बिबट्याने एका झेपेत खासदार महाडिक यांच्या निवासस्थानाची संरक्षकभिंत गाठली. त्यात बंदोबस्ताला आलेल्या महिला कॉन्स्टेबलला त्याने धडक दिली. या धडकेने महिला कॉन्स्टेबल गलितगात्र झाल्या. या बिबट्याच्या आक्रमकपणामुळे नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला.उद्योजक देशपांडे यांच्याकडे सुतारकामासाठी मी सकाळी नऊ वाजता कामासाठी बंगल्यावर आलो. बंगल्याच्या पाठीमागील खोलीतील साहित्य बाहेर काढून पुन्हा खोलीत गेलो, तेवढ्यात ‘वाघ...वाघ...’ अशी आरडाओरड सुरू झाली. क्षणाचाही विलंब न लावता मी खोलीचे दार बंद करून आत थांबलो. खिडकीतून बाहेर बघितले. बिबट्या खोलीकडेच धावत येत होता. त्याला पाहून पायाखालची जमीनच सरकली. ओरडायची तरी पंचाईत, गप्प राहून खिडकीतून सर्व पाहत होतो. ‘बिबट्या पकडला’ असे ओरडताना ऐकले, मात्र बाहेर येण्याचे काही धाडस होईना. अखेर लोकांची गर्दी झालेली पाहून मी बाहेर आलो. - भगवान सावंत (सुतार कारागीर)वाघबीळ येथे २००९ मध्ये बिबट्या पकडण्याच्या कामात सहभागी झालो होतो. त्यामुळे बिबट्या पकडण्याचा अनुभव असल्याने रुईकर कॉलनीत मी पुढाकार घेतला. आम्ही पहिल्यांदा मोकळ्या जागेभोवती जाळे लावलेच, पण त्याचसोबत सर्व दुचाकी लावून त्याला दुसऱ्या बाजूने हुसकाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाळीवरून उडी मारून बिबट्या देशपांडे यांच्या बंगल्यात शिरला. तो पोर्चमधील सोफ्याखाली जाऊन बसला. यावेळी आम्ही सर्वांनी त्याच्यावर जाळे टाकून उडी मारून त्याला पकडले. - सलमान बागवान, प्राणिमित्र०११२०१५ -कोल- सलमान बागवान पेरूच्या फांदीने वाचविला जीवडाव्या हातावर हल्ला : प्रमोद देसार्इंची मृत्यूच्या जबड्यातून सुटकाकोल्हापूर : साक्षात मृत्यूच्या जबड्यातून जीव वाचणे कशाला म्हणतात याचाच अनुभव रुईकर कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देसाई यांनी आज, गुरुवारी सकाळी घेतला. हातात असलेल्या पेरूच्या फांदीचा टोकदार खोचका बिबट्याच्या डोळ्यात लागल्यानेच त्यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. आपला पुनर्जन्म झाल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.देसाई हे काँग्रेसचे उत्साही कार्यकर्ते. आज सकाळी साधारणत: पावणेआठच्या सुमारास त्यांना विलासराव वाघमोडे यांचा कॉलनीत वाघ आला आहे, असा फोन आला. देसाई यांनी मोटारसायकल काढली व दत्त मंदिराकडे गेले. तिथे खेळणाऱ्या मुलांनी त्यांना खुळ्यात काढले. ‘वाघ आलाय? मग काल तरी ३१ डिसेंबरला आणायचा नाही का?’ अशी चेष्टा त्यांनी केली. तोपर्यंत काही मुले ‘वाघ वाघ’ आल्याचे ओरडत आल्याने त्यांना विश्वास बसला.त्यावेळी बिबट्या शिंदे रेसिडेन्सीपासून दत्त मंदिराजवळच्या झुडपात घुसला. साधारणत: पावणेदहा वाजले होते. वनविभागाचे कर्मचारी, माकडवाला वसाहतीतील तरुण, अग्निशामक दलाचे जवान तेथे आले होते. आमच्याकडे कोणतेच हत्यार नव्हते. तेथील पेरूच्या झाडाच्या फांद्या तोडल्या व त्या हातात घेतल्या. त्या झुडपाला जाळी लावायची आणि बाजूला व्हायचे म्हणून आम्ही पुढे गेलो. जाळी लावलीही; परंतु तोपर्यंत फोटो काढणाऱ्यांच्या आवाजाने बिबट्या बिथरला व तो बाहेर आला. पुढे आल्यावर जाळीत अडकला; परंतु काही क्षणांतच तो त्यातून बाहेर पडला. माझ्यासह सगळ्यांनीच तेथून धूम ठोकली; परंतु त्याच्या नजरेच्या टप्प्यात असल्याने तो माझ्याकडे वेगाने झेपावला. त्याने माझ्या अंगावरच झेप घेतली. मी प्रसंगावधान राखून मागे सरकलो व डावा हात पुढे केला. त्यामुळे त्याच्या जबड्यात माझा हात सापडला. त्याने पोटावर पंजा मारला; परंतु मागे सरकल्याने माझ्या जर्किनसह बनियनमधून पोटावर ओरखडे पडले. गुडघ्यावर बसून मी बचाव करीत होतो. त्याने मला दोन-चार फूट तसेच फरफटत नेले. माझ्या उजव्या हातात पेरूची फांदी होती. मी सगळी ताकद एकवटून त्याच्या डोक्यात तीन-चारवेळा फटके दिले; परंतु त्याने बिबट्यावर काहीच फरक पडत नव्हता. शेवटचा फटका त्याच्या डोळ्यावर मारल्यावर तो त्याला जोरात लागल्याने त्याने जबड्यातून हात सोडला. मी मागे पाहत पळत सुटलो. देसाई यांच्या हाताला चार ठिकाणी खोल जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर सीपीआर व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
कोल्हापूरच्या नागरी वस्तीत डुकरासारखा पकडला बिबट्या
By admin | Published: January 02, 2015 12:29 AM