सोलापूर : बिबट्याचे अधिवास हा जिल्ह्याचा परिसर नाही. त्यामुळे तो फिरत आहे. सध्या तो शिरापूर परिसरात असून तिथे उसाचे क्षेत्र असल्याने त्याचा शोध घेणे कठीण बनले आहे. तरीही वन विभागातर्फे ट्रॅप कॅमेरे लाऊन गस्ती वाढविण्यात आली आहे.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे बिबट्याने वासराची शिकार केली. परिसरातील ठसे आणि ज्याप्रकारे वासरू मेले आहे, त्यावरून वासराची शिकार बिबट्यानेच केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत वासराच्या अंगावर दात लागल्याच्या खुणा दिसत होत्या. बिबट्याने वासराला १०० फुटांपर्यंत फरपटत नेल्याच्या खुणा आणि पायाचे ठसेही तिथे होते.
शिरापूर येथील घटनेनंतर बिबट्याने अद्याप इतर प्राण्यांवर हल्ला केलेला नाही. नागरिकांनाही बिबट्या दिसलेला नाही. शिरापूर परिसरात त्याच्या पायाचे ठसे निदर्शनास आलेले नाहीत. मंगळवारी झालेल्या घटनेमुळे बिबट्या हा कोंडी परिसरातून शिरापूर परिसरात गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. बिबट्याला कोंडी परिसर हा सुरक्षित नव्हता त्यामुळे तो शिरापूरला असावा. या परिसरात उसाचे क्षेत्र असल्यामुळे कॅमेरे लावण्याला वाव नाही. तरीदेखील वन विभागातर्फे कॅमेरे लावण्यात आले आहेत. सगळीकडे ऊस असल्यामुळे बिबट्याला शोधण्यात मर्यादा येत आहेत.
वन विभागातर्फे शिरापूर, कोंडी तसेच बिबट्या येण्याची शक्यता असलेल्या परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. वन अधिकारी व कर्मचारी हे परिसरात पेट्रोलिंग करत आहेत. आपल्या वाहनाला माइक लाऊन बिबट्या दिसल्यास कोणती काळजी घ्यावी याविषयी माहीती देत आहेत. तसेच नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करत आहेत.
जिल्ह्यामध्ये बिबट्याचा नैसर्गिक अधिवास नाही. त्यामुळे तो एका ठिकाणी न थांबता फिरत असावा. त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही शिरापूर परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. आणखी कॅमेरे लावण्याची तयारी करण्यात आली आहे. परिसरामध्ये गस्त वाढवून जनजागृती करत आहोत.
- जयश्री पवार, वन क्षेत्रपाल
शिबिर घेण्याचा विचार
जिल्ह्यामध्ये बिबट्याचा वावर आढल्याने वन विभागातर्फे जनजागृती शिबिर घेण्याचा विचार करण्यात येत आहे. बिबट्याच्या स्वभावाचा अभ्यास असणारे तज्ज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांसोबतच वन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत एखादे मार्गदर्शन शिबिर घेण्याचा वन विभागाचा विचार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये जागृती निर्माण होईल. यासाठी माध्यमाची मदत घेण्यात येणार आहे.
-------