सत्यवान दाढे
अनगर : आई हा पहिला गुरू असतो. गुरू ही पहिली आई. आपल्या मुलांना घडविण्याबरोबरच इतर मुलांनाही तितकीच माया, आपुलकी दाखवून पुरोगामीत्वाची मशाल कायम राखणाºया आणि उत्कृष्ट शिक्षिका असणाºया शशिकला काळे यांनी सर्वांनाच धडा घालून दिला आहे.
मूळच्या सोलापूरच्या असणाºया शशिकला या लग्नानंतर घरीच काम करत होत्या. त्यांना मनातील अस्वस्थता बसूच देत नव्हती. इंग्रजीचे शिक्षण झाल्याने त्यांनी घरीच इंग्रजी विषयाच्या शिकविण्या चालवून कुटुंबाचा गाडा चालविला. पुढे लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्या प्रेरणेने त्यांनी आपले अर्धवट शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी अनगर प्रशालेत विद्यार्थीप्रिय इंग्रजी व संस्कृत शिक्षिकेची नोकरी केली. लग्नानंतर दहा वर्षांनी शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपला मुलगा विवेक काळेला डेप्युटी कलेक्टर बनविले. आज तो सिंदखेडराजा या ठिकाणी उपजिल्हाधिकारी या पदावर काम करतोय, तर एक मुलगा डॉक्टर आहे. सून डॉक्टर आहे तर दुसरी तलाठी आहे.
त्यांना पती विठ्ठल काळेंची तितकीच साथ होती पण ते आज हयात नाहीत. मुळात त्या पुरोगामी विचारांच्या आहेत. आज त्या सेवानिवृत्त आहेत. अनगरमधील अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे त्यांचे कार्य सर्वांनाच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतील.
आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले नाहीआज जरी आपण सिंदखेडराजाचा प्रांताधिकारी म्हणून दोन तालुक्याबाबत निर्णय घेत असलो तरी घरी मात्र आईचेच निर्णय प्रमाण असतात. तिचा धाक आजही कायम आहे. ती पुरोगामी विचारांची आहे. सर्व निर्णयाचे अधिकार स्वत:कडे असूनही माझ्या भावासह आपल्या शिक्षणविषयक तसेच जीवनाचा साथीदार निवडण्याविषयी आमचे स्वातंत्र्य कधी हिरावून घेतले नाही. आम्ही दोघांनीही केलेल्या आंतरजातीय विवाहाला तिने पाठिंबा दिला आणि दोन्ही सुनांना मोठ्या मनाने स्वीकारले. अशा या माऊलीचा मला गर्व असल्याचे त्यांचे चिरंजीव आणि उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांनी सांगितले.