सांगोला तालुक्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या ५५ हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुविधा पुरवून अध्यापन सुरू आहे. कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षात शाळा बंद ऑनलाईन शिक्षण सुरू हा पॅटर्न राबवला होता. त्याच पद्धतीने चालू शैक्षणिक वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करताना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी व्हॉट्सॲप, यूट्यूब या सोबतच दूरदर्शनसह इतर माध्यमांचा वापर करून शिक्षण देण्यात येत आहे.
----
१०० टक्के शाळा भेटीचे नियोजन
तालुक्यातील १ हजार ४९ शिक्षकांच्या माध्यमातून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे त्याचबरोबर ऑनलाईनची सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देत, ऑनलाईन शिक्षण घेण्यासंदर्भात शिक्षक गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्याचबरोबर शिक्षक शाळेवर हजर राहतात की नाहीत त्यासंदर्भात १०० टक्के शाळा भेटीचे नियोजन केले आहे.
----
कोणताही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शिक्षण विभागामार्फत पुरेपूर प्रयत्न सुरू असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत.
- प्रदीप करडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी
---