कोल्हापूर : कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात अलीकडच्या काळात बिबट्या, वन्यहत्ती, रानगवा यासारख्या वन्यप्राण्यांचा वावर लोकवस्तीच्या परिसरात होत आहे. येथील नागरिकांना भयमुक्त वावरता यावे, यासाठी वन विभागाच्यावतीने आयोजित दोनदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमधील वनअधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी, तसेच देशातील व राज्यातील काही नामांकित तज्ज्ञांच्या साहाय्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव (आय.एफ.एस.) यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे (आय.एफ.एस.) यांच्या उपस्थितीत झाले.यामध्ये वन्यजीव व मानव संघर्षाला तोंड देण्यासाठी सांघिक काम, जनजागृती व लोकसहभाग, जमावास हाताळणे, आपत्कालीन बचाव दलाची स्थापना करणे, प्राण्यांचे व्यवस्थापन, बिबट्याला पकडणे व हाताळणे, पकडलेल्या बिबट्याची सुटका व स्थलांतर करणे, पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितस्थानी हलविणे, बिबट्याचे संनियंत्रण, बिबट्याच्या हल्ल्यातील बचाव, नरभक्षकास हाताळणे, बिबट्याचा हल्ला झाल्यास घ्यावयाची खबरदारी, पशुवैद्यकीय अधिकारी यांची भूमिका, प्रसारमाध्यमांची भूमिका, अग्निशामक दलाची भूमिका, अशा अनेक बाबींची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. तसेच सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांंकडून उपकरणे हाताळणे, औषधांचे डोस, इत्यादींबाबत कृतीदेखील करून घेण्यात आली. या कार्यशाळेकरिता तज्ज्ञ म्हणून नाशिक वनवृत्ताचे सुनील वाडेकर व वन्यजीवच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विद्या अत्रेय, तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई येथील सहायक वनसंरक्षक व इतर तज्ज्ञ, डॉ. सुहास देशपांडे व पाचही जिल्ह्यांतील वनाधिकारी उपस्थित होते.
वन्यजीव व्यवस्थापनाचे धडे
By admin | Published: March 04, 2015 11:25 PM